मुंबई : जालन्यातील अंतरवाली सराटी मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation) झालेल्या पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीमार प्रकरणात अजून आदेश कोणी दिला याचाच थांगपत्ता लागलेला नसतानाच तत्कालिन पोलीस अधीक्षक तुषार दोषी (Tushar Doshi) ची बदली पुण्यात झाल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis) हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे, मंत्री दीपक केसरकर यांनी तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे तुषार दोषींच्या बदलीवरून सरकारमधील बेबनाव समोर आला आहे. 


विजय वडेट्टीवार यांनी दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करून महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? अशी विचारणा करत मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी  गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन? सवाल केला आहे. 


विजय वडेट्टीवार काय म्हणाले?


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही.  त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. 






ते पुढे म्हणात, लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात 'क्रिम पोस्ट'वर बदली मिळाली. मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन अशी चर्चा सुरू असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करत आहेत.


विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाबाबतची माहिती पत्रांवर पत्रे लिहिल्यानंतर मिळत नाही, केसरकरांचे हे पत्र मात्र लगेच सार्वजनिक होते. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्‍याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे. महायुतीचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू पाहणारे हेराफेरी सरकार आहे. 


सक्तीच्या रजेवरील तुषार दोषींची बदली


दुसरीकडे, जालनामधील अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप झाला होता. या सर्व प्रकरणाची गृह विभागाने गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी (IPS Tushar Doshi) यांच्यावर पहिली कारवाई केली होती. पोलीस अधीक्षक दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश गृह विभागाने काढले होते. मात्र, आता दोषी यांची जालना येथून बदली करण्यात आली आहे. तुषार दोषी यांची बदली पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या