मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. साडेचार वर्ष विरोधी पक्षनेते असलेल्या विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना सरकारमध्ये मंत्रिपदाची खुर्ची मिळाली आहे.
दरम्यान वडेट्टीवार यांची निवड विरोधी पक्षनेते म्हणून झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री दोन्ही विदर्भाचे असल्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सुद्धा विदर्भातून आहेत. हे पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झालं आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वडेट्टीवार यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आज अधिकृत घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला. निवडीनंतर आधीचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी जागेवर जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान वडेट्टीवार यांना तरी आमच्याकडे ठेवा, अशी मिश्कील टीप्पणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे, असा टोला लगावला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीमाना देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर भाजपत प्रवेश केला. साडेचार वर्ष विरोध केल्यानंतर आता ते राज्याचे मंत्री आहेत.
विधानसभेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी बढती मिळालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नानेच लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस एकमेव जागेवर विजय मिळवता आला होता. त्यानंतर त्यांची विधानसभा गटनेतेपदी त्यांची बढती मिळाली होती.
विजय वड्डेटीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्षांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2019 01:58 PM (IST)
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. साडेचार वर्ष विरोधी पक्षनेते असलेल्या विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना सरकारमध्ये मंत्रिपदाची खुर्ची मिळाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -