Monika More : 2014 साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे (Monika More) या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया 28 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यात हातांची नियमित हालचाल करण्यास मोनिकानं सुरूवात केली. काल (24 एप्रिल) चक्क तिने हातात बॅट घेऊन बॅटिंग केली.
मोनिका मोरे हिच्यावर परळ येथील ग्लोबल रुग्णलयात शस्त्रक्रिया पार पडली होती. त्याकरिता 15 तासांचा अवधी लागला होता तसेच 35-40 डॉक्टरांचा यामध्ये सहभाग होता. डॉ. निलेश सातभाई यांनी या संपूर्ण शस्त्रक्रियांचे नेतृत्व केले होते. मायक्रोव्हयस्कुलर, ऑर्थोपेडिकस, प्लास्टिक सर्जन आणि अॅनेस्थेसिस्ट या विविध विषयातील तज्ञांचा या टीममध्ये समावेश होता. तिच्या दोन्ही हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
मोनिका महाराष्ट्रातील हाताचे प्रत्यारोपण करणारी पहिली मुलगी आहे. कुर्ला येथे राहणाऱ्या मोनिकाच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. मोनिकाला हात मिळावेत ही त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी ते खूप मेहनतही घेत होते. मोनिकाच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालय व्यवस्थापन आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मदत केली होती. अपघात झाल्यानंतरही जिद्दीने आपलं पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.
"पूर्वीच्या प्रोस्थेसिस पेक्षा मी माझ्या सध्या या हातांवर प्रचंड खुश आहे. मी आता छोट्या-छोट्या वस्तू या दोन हातांनी उचलायचा प्रयत्न करत आहे. मी अंगठ्याचा वापर करून मोबाईलवर मेसेज टाईप करू शकते. याकरिता रुग्णलयातील माझे डॉक्टर निलेश सातभाई आणि फिजिओथेरपिस्ट डॉ. प्राजक्ता करंबे खूप मेहनत घेत आहे. मला नक्की विश्वास आहे, पुढच्या सहा महिन्यात माझी हाताची हालचाल बऱ्यापैकी झालेली असेल. मी जेव्हा केव्हा चांगली हालचाल करेन तेव्हा मी प्रथम माझ्या बाबांच्या फोटोला नमस्कार करेन. माझं पूर्ण नाव लिहीन. मी व्यवस्थित झाल्यावर मला माझ्या कुटुंबीयांकरिता नोकरी करायची आहे. सध्या हाच माझ्या आयुष्यातील प्राधान्यक्रम आहे." असं मोनिकानं हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर सांगितलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या: