नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला चांगलंच सुनावलं.


राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करणार आहात का, असा सवाल यावेळी खडसेंनी सरकारला केला.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

केंद्र सरकारनं घालून दिलेल्या निकषांनुसार राज्यातील एकही गावात दुष्काळ जाहीर होऊ शकत नाही,  त्याबद्दलही खडसेंनी नाराजी व्यक्त केली.

सरकार मदत करत नाही, लोकांनी मरायचं का?

खडसे म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करा, यासाठी मी यासाठी पहिल्यांदा ४ जुलै रोजी पत्र दिले आहे. तरीही सरकार सांगते तक्रार मिळाली नाही. या तीन तालुक्यात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी आहे. पाणीटंचाई असल्याने मी सप्टेंबरपासून मदत मागतोय, दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करा अशी विनंती केली, पण सरकारने काहीही केलं नाही. सरकार मदत करत नाही, लोकांनी मरायचं का? केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत, त्या निकषानुसार राज्यातील एकही दुष्काळी गाव बसणार नाही.  केंद्र सरकारने तयार केलेले निकष बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत करा”

चंद्रकांत पाटलांचं उत्तर

खडसेंच्या प्रश्नांना सरकारकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं.

“खडसे बोलतात ते बरोबर आहे. केंद्राचे निकष अधिक कडक आहेत. पण यात एकही गाव बसणार नाही असे नाही, आम्ही गोंदिया जिल्ह्यातील ३ तालुक्यात याच निकषावर दुष्काळ जाहीर केला आहे.  पण हे निकष बदलावे यासाठी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, याबाबत अधिवेशन संपल्यावर दिल्लीला जाऊ. केंद्राच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर केला नाही तर केंद्र सरकारची मदत मिळणार नाही. ज्या गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असेल त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ

अजित पवार

लिहिलेल्या उत्तरात तुम्ही म्हटलंय की ही गावं 50 आणेवरीच्या आत आहेत मग जाहीर का करत नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.

संबंधित बातम्या

तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना खडसे अडखळले...