नागपूर: सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला असून, कार्यवाहीसाठी उपसमिती स्थापन करण्यात आल्याची माहिती, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी विधानपरिषदेत दिली.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यावं, अशी मागणी धनगर समाजाकाडून सातत्याने होत आहे. तर शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे, त्यामुळे सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचं नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली होती.

मात्र गेल्या महिन्यात नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.

काय आहे सोलापूर विद्यापीठ नामकरणाचा वाद ?

सोलापूर विद्यापीठाला बसवेश्वर, सिध्देश्वरांचं नाव द्यावं अशी मागणी लिंगायत समाजाकडून समोर आली होती. अहिल्याबाई होळकर यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याबाबत लिंगायत समाजाचा विरोध होता, म्हणूनच हे नाव बदलल्यास जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असं पत्र सोलापूर विद्यापीठाने राज्य सरकारला लिहीलं होतं.

पण तरीही धनगर समाजाच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची घोषणा केली होती. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि त्याच्या कार्यवाहीसाठी उपसमिती गठीत करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

शिवयोगी सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत. 12 व्या शतकातील या महापुरुषाने लोकोद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. सिद्धरामेश्वरांच्या कार्याचा दाखला देऊन, त्यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व मठांनी आणि देवस्थानांनी केली होती.

दुसरीकडे धनगर समाजाने विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासाठी लढा उभा केला होता. ऑगस्टमध्ये धनगर समाजाने विराट मोर्चा काढून सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी केली होती. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला शिवसेनेसह इतर समाजिक संघटना आणि संस्थांनी पाठिंबा दिला होता.

पण नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचं नामांतर अहिल्यादेवी होळकर करण्याची घोषणा केली. त्यामुळे लिंगायत समाज नाराज झाला. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवा संघटना, सिद्धेश्वर भक्त आणि वीरशैव महिला संघटना आदी संघटनांनी 13 नोव्हेंबरला सोलापूर बंदची हाक दिली होती.

संबंधित बातम्या

VIDEO : स्पेशल रिपोर्ट : सोलापूर विद्यापीठ, नामांतर आणि वाद

सोलापूर विद्यापीठाला अखेर अहिल्याबाई होळकरांचं नाव!

क्या हुआ तेरा वादा...? मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच गाणं वाजलं

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक 


सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचं नाव द्या, लिंगायत समाजाची मागणी