Eknath Khadse And Sachin Ahir : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि सचिन अहिर यांचा विधान परिषद निवडणूकीत विजय झाला. पहिल्या फेरीनंतर एकनाथ खडसे यांना 29 तर सचिन अहिर यांना 26 मते मिळाली. विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि सचिन अहिर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत...
म्हणून सचिन अहिर यांना मंत्रिपद? -
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सचिन अहिर यांनी शिवसेनेचा झेंडा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपल्या बालेकिल्ल्यातून माघार घेतली होती. वरळी मतदारसंघामध्ये सचिन अहिर यांची मोठी पकड आहे. पण आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळेच शिवसेनेने त्यांना आता विधानपरिषदेचं तिकिट देत विधिमंडळात पुनर्वसन केले. त्यातच पुढील काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी त्यांना मंत्रिपद देत वरळीकरांना आकर्षित करण्याचा शिवसेना नक्कीच प्रयत्न असेल. एका कथित प्रकरणामुळे मंत्रिपद गमवावे लागलेले संजय राठोड यांच्याजागी आता त्यांची वर्णी लागू शकते. त्यामुळे लवकरच सचिन अहिर यांना वनमंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते.
एकनाथ खडसेंनाही मंत्रिपद मिळणार?
भाजपमधील अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले एकनाथ खडसे यांनाही मंत्रिपद दिले जाऊ शकते. खडसेंचा अनुभव लक्षात घेता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते. पक्ष सोडल्यापासून एकनाथ खडसे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार सतत आरोप करत असतात. नवाब मलिक यांचे रिक्त मंत्रिपद एकनाथ खडसे यांच्या वाट्याला येऊ शकते.
विजयानंतर खडसे काय म्हणाले? -
विजयानंतर एकनाथ खडसे भावूक झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपमधील मित्रांनी मला अतिरिक्त मदत दिली. मागील सहा वर्षांत माझी खूप छळवणूक झाली होती. ईडी वगैरे तपास यंत्रणा लावल्या. मंत्रिपदावर असताना खोटे आरोप करुन राजीनामा घेतला. आरोप खोटे ठरले, झोटिंग अहवाल आला, तिथेही काही नाही मिळालं. ईडी चौकशी झाली, जावयाला अटक, बायको, मुलींना समज पाठवला. तीन आठवड्यापूर्वी आदेश आला, माझी राहती घरं खाली करण्याचे आदेश, बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व खात्यातील सर्व पैसे काढले, एकूण एक पैसा काढून घेतला. अजून छळ थांबलेला नाही. ईडी-सीडीचा विषय योग्य वेळी काढेन, विधानपरिषदेत अनेक विषय मांडणार आहे. तसेच आता राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी मदत करणार आहे.