मुंबई  : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे घमासान पाहायला मिळणार आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपने आपापल्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे.


विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं ठरणार आहे. एकही आमदार रणांगणाबाहेर राहू नये यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून खबरादारी घेतली जात आहे.  राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत देखील मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप मतदानाचा हक्क बजवणार आहे.  भाजपच्या या दोन्ही आमदारांनी आजारपणातही मतदान करण्याचा निर्णय  घेतला आहे.  मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांना मतदानादिवशी योग्य ती काळजी घेऊन भाजप विधान भवनात हजर राहणार आहे.  डॉक्टरच्या सल्लाने या दोन्ही आमदारांना मुंबईत मतदानासाठी आणले जाणार आहे. 


राज्यसभा  निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केल्यानंतर भाजप पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या तयारीला लागलीय. फक्त तयारीच नाही तर दुसऱ्यांदा महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी रणनीती आखत असल्याची माहिती मिळतेय आणि त्याचसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठका सुरू आहेत.  भाजपने  राज्यातील सर्व आमदारांना 18 जून रोजी मुंबईत बोलावलं आहे. मुंबईत ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये या आमदारांचा मुक्काम असेल. भाजपने राज्यसभेप्रमाणे येथेही एक टास्क फोर्स नेमली आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीची धुरा देवेंद्र फडणवीस यांनी या त्रिमूर्तींवर टाकली आहे.


विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?


- विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मतांची आवश्यकता आहे. 


- राज्यसभेप्रमाणे मतदान झालं तर भाजपकडे सध्या 123 संख्याबळ आहे.


- त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.


- पाचव्या उमेदवारासाठी भाजपला 12 मतं कमी पडतात


- महाविकास आघाडीकडे 161 संख्याबळ आहे.


- त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. 


- तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.