Vidarbha Weather Update : गेल्या कित्येक दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे पुरते हैराण झालेल्या वैदर्भीयांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे मान्सूनची (Monsoon Has Arrived In India) चाहूल लागली असताना नैर्ऋत्य मोसमी पाऊस राज्यातील काही भागात पोहोचला असून येत्या काही दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावत एकच दाणादाण उडवली आहे.
अशातच पुढील तीन दिवस विदर्भातील (Vidarbha) सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. तर दुसरीकडे काल विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेकांच्या घरांवरची छत उडून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठे झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक आणि विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. तर पूर्व विदर्भात हजारो क्विंटल धान पावसात अक्षरक्ष: ओले होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.
बाजार समितीमधील धान अक्षरक्ष: पावसात भिजलं
शनिवारच्या सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यानं अनेक छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांची छत उडालीत. एका कापड दुकानावरील टिनपत्रे अक्षरशः हवेत उडालेत. मात्र रस्त्यावर वर्दळ नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. लाखांदुर बाजार समितीच्या परिसरातीलही टिनपत्रे उडाल्यानं येथील आवारात ठेवलेली धानाची हजारो पोती पावसात भिजलित. तर वादळी वाऱ्यानं दोन झाडं उन्मळून पडल्यानं श्रीकांत बावनकुळे यांच्या धानाची पोती त्यात दबल्यानं आणि पावसात भिजल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. तर, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सुकण्यासाठी टाकलेले धान ओले झाले आहेत.
मान्सूनपूर्व पावसाचा धान उत्पादक शेतकरी अन् व्यापाऱ्यांना जबर फटका
अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना जबर फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे काल वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत केलं. लाखांदूर कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेले हजारो क्विंटल धान पावसात ओले झालेत. यामुळं या धानाला योग्य दर मिळणार नसल्यानं ते सुखवण्याची धडपड आता त्यांची सुरू आहे. बाजार समिती व्यवस्थापनानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या धान सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना केली नसल्यानं हा धानसाठा ओला झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या वादळी वाऱ्यानं परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडलीत. तर, अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या दुकानावरील छते उडाल्याचं चित्र लाखांदूर परिसरात बघायला मिळालं.
वर्ध्यातील कारंजा तालुक्यात जोरदार पाऊस
वर्ध्यातील कारंजा घाडगे तालुक्यात काल दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह वादळीवारासोबत जोरदार पावसाने हजेरी लावली. कारंजा तालुक्यात धुव्वाधार पाऊस झालाय.या पावसामुळे शेतीच्या कामाची लगबग सुरू होणार असून उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. तर अनेक ठिकाणी मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक काही काल विस्कळीत झाली होती.
वडगाव जंगल ठाण्याचा कारभार टेंटमधून
वादळाच्या तडाख्यात वडगाव जंगल पोलीस ठाणे इमारतीवरील टिनाचे छप्पर उडून गेल्यामुळे वडगाव जंगल पोलीस ठाणे आता उघड्यावर आले. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार चालविण्याकरिता तात्पुरता टेन्ट उभारण्यात आला आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी बसण्याची सोय नसल्याने नवीन पेच निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने ठाण्याचे छप्पर उडून गेले. संगणक आणि कागदपत्रे पावसाने ओली झाली. छप्पर उडल्याने ठाण्यात कामकाज कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता.
ठाणेदारांच्या कॅबिनमध्ये स्टेशन डायरी आणि वायरलेसची व्यवस्था करण्यात आली. तर ठाणेदारांना कामकाज सांभाळण्यासाठी समोरील मैदानात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जाड गोणपाटाचा टेन्ट उभारण्यात आला आहे. ठाणेदार, ठाणे अंमलदार, वायरलेससाठी तात्पुरती सोय झाली असली तरी बिट जमादार आणि इतर कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था नाही, परिणामी पोलीस ठाणे उघड्यावर आल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या