Vidarbha Weather Update नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भात  उष्णतेचा पाऱ्याने (Temperature) उच्चांक गाठला आहे. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. एकीकडे मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली असताना दुसरीकडे अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून भारतात दाखल झाला आहे. तर मान्सूनचं (Monsoon Latest Updates) केरळ (Kerala News) आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालं आहे. तसेच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.


मात्र, त्यापूर्वीच विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा (Rain)  इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून या पावसाचे सावट उद्या पार पडणाऱ्या मतमोजणीवरही असल्याचा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे.


विदर्भात पुढील पाच दिवस मान्सून पूर्व पावसाचा इशारा


विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर  आज पासून पुढील 5 दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर 5 जून नंतर अमरावती, बुलढाणा आणि अकोला वगळता विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रती तास सोसाट्याचा वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काल 2 जून रोजी दुपारनंतर विदर्भात सर्वत्र तुरळक ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर प्रचंड उकाडा आणि दमट वातावरणामुळे वैदर्भीयांचे पुरते हालेहाल झाल्याचे बघायला मिळाले.   


वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा


बुलढाणा जिल्ह्यात उकाड्या ने हैरान झालेल्या नागरिकांना आज दुपारी अचानक आलेल्या पावसाने दिलासा दिलाय. जिल्ह्यातील वाढते तापमान आणि गरम झालेलं राजकीय वातावरण आणि  त्यात आलेल्या मान्सून पूर्व पावसाच्या सरी यामुळे बुलढाण्यात वातावरण आल्हाददायक झाल्याचं चित्र आहे. उद्या मतमोजणी होत असताना ठिकठिकाणी चर्चा रंगताना ही दिसत आहे. सकाळपासुन कडक उन्हामुळे आणि  उकाड्यामुळे हैरान झालेल्या नागरिकांना मात्र अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे आज अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यालाही पावसानं झोडपलं. तालुक्यातील माना, कुरूम भागात आज जोरदार पाऊस झालाय. गेल्या तासभरापासून सुरू असलेल्या  मान्सुनपुर्व पावसाने सर्वसामान्य मात्र काहिसे सुखावले आहे. आज जिल्ह्याचा पारा 43 अंशांवर होता. मात्र संध्याकाळच्या सुमारास झालेले पावसाने काही अंशी दिलासा दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या