कोल्हापूर : राज्याभरात थंडीचा जोर वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचले आहे. थंडीमुळे कोल्हापुरात रस्त्यावर झोपणाऱ्या 2 व्यक्तींचा गारठून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या कोंबडी बाजार परिसरात ही घटना घडली आहे. कडाक्याच्या थंडीने राज्यातला हा पहिला बळी ठरला आहे.

खंडेराव दिनकर कारंडे असं एका मृत व्यक्तीचे नाव आहे, तर दुसऱ्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघांचे मृत्यू हे नैसर्गिक असून, थंडीमुळे हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

राज्यभरात तापमानात घसरण
सध्या राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचले आहे. नाशिकचं तापमान 8.5 अंश तर धुळ्यातील तापमान 6.8 अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे . तसेच गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्याने कालपासून ढगाळ वातावरणासह तापमानात घट झाली आहे. परभणी जिल्ह्यातही तापमान घटले आहे. त्यासोबतच मुंबईतही थंडीचा जोर वाढला असून तापमानात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे.