Mohan Agashe : अभिनेते मोहन आगाशे यांना आज पुण्यभूषण पुरस्कार (Punyabhushan award) प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण शर्मिला टागोर आणि पद्मभूषण अनुपम खेर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आला. यावेळी अनुपम खेर यांनी आगाशे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आगाशेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओदेखील शेअर केला. हा व्हिडीओ खेर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
ज्या शहराने मला दोषासकट सांभाळून घेतले त्या पुण्यात आज हा सन्मान होत आहे, याचा आनंद आहे. माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी आलेला हा पुण्यभूषण पुरस्कार आहे. मी केलेले काम एकट्याने केलेले नाही. ज्या ज्या क्षेत्रात काम केले ते अनेकांनी मिळून केले आहे, त्यामुळे हा माझा एकट्याचा पुरस्कार नाही. वैद्यकशास्त्राने मला विचार शिकवले आणि नाटक सिनेमा यांनी मला माणसे समजून घ्यायला शिकवले. आयुष्य समतोल करायला याची मदत झाली, अशा भावना मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.
मोहन आगाशेंच्या यांच्या कामाचा आलेख पाहिला तर त्यांचे काम भारतभूषण इतके मोठे आहे. डॉ. आगाशे यांचा सन्मान पुण्यभूषण पुरस्काराने करताना स्वतःचा सन्मान झाल्याची भावना मनात आहे, असं ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर म्हणाले. आयुष्यात लोकप्रिय होणे सोपे असते, पण जीवनात आदर प्राप्त करायचा तर मोहन आगाशे यांच्यासारखे आयुष्य जगणे आवश्यक आहे. मोहन आगाशे यांच्या छोट्याशा कार्यालयात मी काल काही वेळ घालवला. त्यांच्याशी बोलताना लक्षात आले की ती 45 मिनिटे मला जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहोत याची जाणीव करून देणारी होती.
पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याला मला उपस्थित राहता आले हे माझे भाग्य आहे. वाढदिवसाच्या दिवशी असा पुरस्कार मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही. डॉ. आगाशे आणि माझी 40 वर्षांची मैत्री आहे. आम्ही नेहमी भेटत नसलो, तरी एकमेकांविषयी खूप आदर आहे. मोहन केवळ अभिनेता नाही, तर अनेक गोष्टी एकावेळी करणारे व्यक्तिमत्व आहे. नेहमी चौकटी मोडणारा आणि धाडसाने धोका स्वीकारण्यास तो नेहमीच तयार असतो, असं शर्मिला टागोर म्हणाल्या.
यावेळी बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, पुण्यात गुणवान रत्नांची खाण असताना त्यातून एका रत्नाची निवड करणे खरेच अवघड असते. चॅट जिपीटीवर डॉ. आगाशे यांची जी माहिती येते ती डॉ. आगाशे यांच्या व्यक्तिमत्वावर विशेष प्रकाश टाकते. पुण्यभूषण स्विकारून डॉ आगाशे यांनी आमचाच सन्मान केला आहे, अशी आमची भावना आहे.
हेही वाचा-