मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवाचा नवीन पूल दुरुस्तीच्या कामासाठी अवजड वाहतुकीस महिनाभर बंद असणार आहे. 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2018 या कालावधीत पुलाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.


या कालावधीत वाहनांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे. वर्सोवा नवीन पुलाच्या दुरुस्तीचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील पहिली मार्गिका 15 दिवस बंद करण्यात येणार आहे.


मार्गिका बंद कालावधीत तिच्या लगत असणाऱ्या दुसऱ्या मार्गिकेवरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पहिल्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचे काम ही सुरु केलं जाईल, असं जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे.


जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात येणार


- अहमदाबादहून ठाणे, मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहने मनोर-वाडा-भिवंडी-ठाणे येथून जातील.
- विरारहून ठाणे, मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहने शिरसाट फाटा-गणेशपुरी-वज्रेश्वरी-अंबाडी-भिवंडी-ठाण्याहून जातील.
- वसई-विरार महानगरपालिका हद्दीतून जाणारी जड-अवजड वाहने चिंचोटी-कामण-अंजुर फाटा-भिवंडी-ठाणे येथून जातील.

महसूल विभागाची वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पोलीस विभाग, तालुका दंडाधिकारी, तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सूरत यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना यामधून सूट असणार आहे, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.