मुंबई : केंद्र सरकारने कालच कोविड संदर्भातल्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यात पूर्ण क्षमतेने सिनेमागृह आणि स्विमिंग पूल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ केंद्राच्या मते कोरोना संपला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल ट्विट करून देशामध्ये काही नवीन निर्बंध आणि खबरदारीचे उपाय जारी करत असल्याचे म्हटल. हे उपाय 1 फेब्रुवारी पासून ते 28 फेब्रुवारी पर्यंत लागू असतील असं त्यांनी सांगितलं. या नव्या नियमांमध्ये सिनेमागृह आणि जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हे निर्बंध केवळ एका महिन्यासाठी असले तरीदेखील यामुळे काही प्रश्न निर्माण होतात. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे केंद्र सरकारच्या मते कोरोना संपला आहे का? याबद्दल चर्चा करायची झाली तर महाराष्ट्रातील सध्याची कोरोनाची आकडेवारी पाहू.
राज्यात काल 2,171 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि 2,556 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. काल पर्यंत एकूण 19,20,006 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 43,393 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.26% झाले आहे. तर 20 जानेवारीला राज्यामध्ये 3015 नवीन रुग्ण सापडले होते आणि 46,769 अॅक्टिव रुग्ण होते. म्हणजेच राज्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
मुंबईची गेल्या 3 महिन्यांची आकडेवारी
तारीख अॅक्टीव रुग्ण
1 ऑक्टोबर 27,435
15 ऑक्टोबर 20,922
1 नोव्हेंबर 18,026
15 नोव्हेंबर 9,956
1 डिसेंबर 12,440
15 डिसेंबर 8,812
31 डिसेंबर 8,014
1 जानेवारी 8,005
15 जानेवारी 7,104
27 जानेवारी 5,644
जसजशी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत गेली, तसतसे मुंबईत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. सुरुवातीला मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या असल्याने घराबाहेर पडण्यास देखील मनाई करण्यात आली होती. मात्र मुंबईकरांनी आणि महानगरपालिका प्रशासनाने कोविडची रुग्णसंख्या कमी करण्यास यश मिळवले आणि एक-एक करून सर्व निर्बंध दूर करण्यात आले.
मुंबईत मार्चपासून अतिशय कडक निर्बंध होते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडून इतर कोणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. मात्र नोव्हेंबरपासून हे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली गेली. सध्या भाजी मार्केट, सिनेमागृह, मैदान, सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार, व्यायाम शाळा, जिमखाने असे सर्वच एकामागे एक सुरू करण्यात आले आहेत. घराबाहेर पडण्यास देखील कोणतेही निर्बंध नाहीत.
मात्र अजूनही मुंबईमध्ये शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यासोबत राणीच्या बागेसारखी मोठी उद्यानं सुरू करण्यात आली नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईची लाईफ लाईन, मुंबई लोकल अजूनही सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. सोबत प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे लोकांमध्ये कोविड संदर्भातली भीती देखील कमी झाल्याचं लक्षात येत आहे. अनेक मुंबईकर आजकाल मास्क न लावता घराबहेर फिरताना दिसून येत आहेत. कोरोना संपला असे त्यांनी गृहीत धरले आहे.
मुंबईत रुग्णांची संख्या कमी झाल्याने लोकांमधली भीती कमी झाली आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र असे असले तरी पूर्ण संपला नाहीये हे देखील ते सांगत आहेत. कोविडची रुग्ण संख्या कमी झाली असली तरी कोविड संपला नाही असे सर्वच सांगत आहेत. केंद्र सरकारने पूर्ण क्षमतेने स्विमिंग पूल आणि सिनेमागृह चालवण्यास परवानगी दिल्यामुळे फेब्रुवारीच्या एका महिन्यात आणि त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने अनेक निर्बंध शिथिल केल्यानंतर देखील महाराष्ट्र सरकारने अतिशय सावधपणे पावले टाकली आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारवर टीका देखील झाली मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला फायदा देखील झाला. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या नव्या सूचनांप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील अनुमती देते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या :