कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात थैमान मांडलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत केलं, लोकांचं राहतं घर, गरजेच्या वस्तू, दागदागिने जवळजवळ त्यांचं सर्वस्व या पुराने वाहून नेलं. आता पूरग्रस्त भागात गरज आहे ती मदतीची. राज्यभरातून पूरग्रस्त भागाला मदतीचा हात मिळतोय मात्र अशा भीषण परिस्थितीतही काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत.


पुरामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे, यामुळे कोलेहापूर शहरात भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोल्हापूरच्या मार्केट यार्डमधील भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मार्केट यार्डमध्येच भाज्यांचा जास्त दर असल्याने किरकोळ भाजीविक्रेत्यांकडे पोहोचल्यानंतर तो आणखी महाग होण्याची शक्यता आहे. आधीच महापुराचं संकट आणि त्यात आता महागाईची भर पडल्याने कोल्हापूरकरांची परिस्थिची बिकट झाली आहे.

कोल्हापूर शहरासह अनेक गावांना पुराने वेढा दिला आहे. पुराचं प्रमाण काही प्रमाणात ओसरल्यामुळे मदत कार्यातील अडथळा दूर झाला आहे. आता राज्यभरातून पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदतही मिळत आहे. स्थानिक दुकानदारांकडून गरजेच्या वस्तूंची विक्री केली जात आहे मात्र काही विकेते या पूरपरिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. आवश्यक वस्तूंची वाढती मागणी पाहता त्या वस्तू वाढूव दराने विकल्या जात आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आल्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला गेला आहे.

पूरग्रस्तांना अशा प्रकारे लुबाडणे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. जर विक्रेते चढ्या दराने वस्तू विकत असल्यास आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.