मुंबईः मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर पनवेल जवळ झालेल्या अपघातानंतर अपघात रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रक आणि बसच्या वाहन चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. वेळप्रसंगी त्यांचे वाहन परवाने सुद्धा निलंबित केले जातील, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
राज्य रस्ता सुरक्षा परिषद समितीची बैठक मंत्रालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे अन्य मंत्री देखील उपस्थित होते.
एक्स्प्रेस मार्गावर आरटीओकडून वाहन तपासाणी
राज्यातील 85 टक्के अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात, तर फक्त 15 टक्के अपघात हे तांत्रिक कारणामुळे होतात. वाहनांचे अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर महिन्यातून दोन वेळा महामार्ग पोलीस आणि आरटीओ यांच्यामार्फत वाहनचालकांची व वाहनांची संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरुन अवैध वाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल. त्याचबरोबर ट्रक आणि बसच्या वाहनचालकांना आठ तासापेक्षा अधिक काम करु देऊ नये, यावर उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असं रावते यांनी सांगितलं.
मद्य चाचणीसाठी टोलनाक्यांवर अल्कोमीटर
यापुढे नव्याने काढण्यात येणाऱ्या महामार्गांच्या निविदा प्रक्रियेमध्ये महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरा, स्पीड गन, स्पीड कंट्रोल यंत्रणा उभारण्याच्या तरतुदी करण्यात येणार आहेत. शिवाय एखाद्या लेनवर अपघात झाल्यास वाहनचालकांना त्याची माहिती देणारे इंडिकेटर लावण्यासाठी यंत्रणा उभारणे, अशा अटी कंत्राटदाराला ठेवण्यात येणार आहेत.
मद्यपी वाहनचालकांवर आळा घालण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील आयआरबीच्या दोन्ही टोलनाक्यांवर अल्कोमीटर बसविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या अपघाताचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. अपघातांना आळा घालण्यासाठई या बैठकीत दूरगामी योजनांवर चर्चा झाली.
एक्स्प्रेस वे वरील तीन आणि चार क्रमाकांची लेन ही ट्रक आणि बससाठी वापरणे, उजव्या बाजूकडील लेन ही फक्त ओव्हरटेक करण्यासाठी ठेवणे या बाबींवर चर्चा झाल्याचंही रावते यांनी सांगितल.