Uday Samant : वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही(  Bulk drug park project)  महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप केला होता. याला आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


अडीत वर्षात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले, याची यादी उद्या जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट उद्योग  मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प राज्याबाहेर बाहेर जात असल्याची टिका केली होती. त्या टिकेला त्यांनी उत्तर दिले आहे. डोंबिवली सर्टर्डे क्लब तर्फे  इंजिनिअर डे निमित्त राज्य स्तरीय उद्योजकता परिषदेचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या परिषदेस उद्योग मंत्री सामंत हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती प्रकल्प महाराष्ट्रबाहेर गेले, याची यादी जाहीर करणार असल्याचं सांगितलं. 
 
युवा उद्योजकांच्या कर्ज मंजूरीसाठी बँकांनी हॅरासमेंट केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कर्ज मागणा:या युवा पिढीच्या उद्योजकांची कर्ज प्रकरणो झिरो रिजेक्शन तत्वावर मंजूर करण्यात यावी. त्यांची बँकाकडून हॅरासमेंट करण्यात येऊ नये. त्यांची हॅरासमेंट केल्याचे आढळून आल्यास संबंधीत बँकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही उद्योग मंत्री सामंत यांनी दिला आहे. 
 
डोंबिवलीतील कारखाने स्थलांतर आणि प्रदूषणावर काय म्हणाले? 
डोंबिवलीतील 156 कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे. त्याविषयी उद्योजक संघटनेशी चर्चा करुन त्यावर बैठक घेतली जाईल. चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर डोंबिवली एमआयडीसीबाबत वारंवार प्रदूषणाच्या घटना घडतात त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळा यांच्यासोबत या भागाचा येत्या आठ दिवसात लवकर दौरा केला जाईल. प्रदूषण होऊ नये यासाठी सूचना केली जाईल. वारंवार सांगूनही उद्योजक ऐकणार नसतील परिस्थिती पाहून कारवाई केली जाईल असे उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे.