मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून आता राजकारण तापले आहे. आता त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदे - फडणवीस सरकारवर नवा आरोप केला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर नवा आरोप केलाय. रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही( Bulk drug park project) महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. दावोसमधून तीन दिवसांत 80 हजार कोटी आणल्याचंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलंय.
आदित्य ठाकरे म्हणले, बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडं नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडं नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार निघून गेले आहेत. अजून तरूण शांत आहेत पण त्यांचा अंत नका पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले मग यांना का जमत नाही?
बल्क ड्रग पार्कसाठी केंद्राला आम्ही पत्र देऊन मागणी केली होती.पण तोही गुजरातमधील भरूचकडे जात आहे. गणेश दर्शन घेणा-या मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का? उद्योगमंत्री म्हणतील की, हे आरोग्य विभागाचा आहे. आरोग्यमंत्री म्हणतील हाफकिनच्या माणसाला विचारा, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त
फॉक्सकॉनबाबत व्हॉटसअॅपवर खोटे मेसेज पसरवले जात आहे. 40 गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त होते. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हा विषय माहिती नाही. किमान उद्योगमंत्र्यांनी उत्तरे दिली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळे हा निर्णय घेतला आहे, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
सुभाष देसाई म्हणाले, आम्ही 38 हजार कोटींचे इन्सेंटिव्ह पॅकेज दिले आहेत. ते आम्ही 40 हजार कोटीपर्यंत नेणार असल्याचे त्यांना सांगितले होते. पण गुजरातने यापेक्षा 12 हजार कोटींचे कमी पॅकेज दिले आहे. आम्ही त्यांना मुंबईत येऊन MOU करायला बोलवले होते. 26 जुलैला वेदांता फॉक्सकॉनचे शिष्टमंडळ सध्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी 1 लाख 69 हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी केंद्राचे सहकार्य मिळाल्याचे बोलले गेले. मग आता कुठे गेले ते सहकार्य? बल्क ड्रग पार्कही गुजरातला गेला आहे. हे नेभळट सरकार आहे, जे बोलत नाहीत.