मुंबई: राज्यातील निवडणुका या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना म्हणून नाही तर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून लढवू आणि सर्वच्या सर्व जागा जिंकू असं मविआच्या पहिल्याच बैठकीत ठरलं असलं तरीही त्यामध्ये काहीसा समन्वयाचा अभाव असल्याचं समोर आलं. पुढच्या बैठकीमध्ये आता वंचितचाही समावेश होणार असून वंचितनेही जागावाटपाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं दिसतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वंचितकडून अधिक जागांची मागणी केली जाऊ शकते अशी शक्यता आहे. 


वंचितकडून महाविकास आघाडीच्या 30 तारखेच्या बैठकीत आपले प्रतिनिधी पाठवत जागा वाटपासंदर्भातली चर्चेत भाग घेतला जाणार आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीतील ताकदीनुसार वंचितकडून जागा वाटपाची मागणी करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे. तशी माहिती वंचित आघाडीच्या सूत्रांकडून एबीपी माझाला दिली आहे. 


सात टक्के मतांच्या आधारे जागा मागणार


सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 7 टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले होते. अशातच त्या व्होट शेअरनुसारच वंचितकडून जागा वाटपासंदर्भात मागणी होताना दिसणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद तुलनेनं कमी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार वंचितकडून त्याचा फायदा घेत अधिक जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 


महाविकास आघाडीकडून वंचितला दोन जागांची ऑफर दिली जाऊ शकते. अशात वंचित आघाडीकडून आकड्यांची गणितं समोर ठेवत अधिकच्या जागा लोकसभा निवडणुकीत पदरी पाडण्याचा विचार आहे. सीपीआयकडून परभणी आणि शिर्डीच्या जागेची मागणी केली गेलेली आहे. वंचितकडून देखील दोनपेक्षा अधिक जागांची मागणी समोर येऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणाच्या पारड्यात किती जागा पडणार हे बघणं महत्त्वाचं असेल. 


नाना पटोले यांना आघाडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही


काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक आघाडीच्या चर्चेतून काँग्रेसने नाना पटोलेंना बाजूला केल्याचं समोर आलं आहे. प्रकाश आंबेडकरांची नाराजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भोवल्याचं सांगितलं जातंय. यापुढे वंचित आणि काँग्रेसमधील बोलणीसाठी काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. 


गुरुवारी महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी वंचितला बैठकीच्या ऐन वेळी निमंत्रण दिल्याने प्रकाश आंबेडकर चांगलेच संतप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी नाना पटोले यांना एक पत्र लिहित त्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलं. दिवसभराच्या घडामोडीनंतर प्रकाश आंबेडकरांशी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी नाना पटोले यांना इंडिया किंवा महाविकास आघाडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं. 


ही बातमी वाचा: