मुंबई : लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर असतानाही महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) अजूनही जागावाटपाचं घोडं गंगेत न्हालेलं नाही. काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटांकडून (Uddhav Thackeray) जागा वाटपाटपांमध्ये कमालीचे आग्रही असल्याने अजूनही 18 जागांवर काथ्याकूट सुरु आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी सुद्धा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले, तरी वंचितकडून येत असलेल्या अटी शर्तींमुळे सन्मानजक तोडगा निघालेला नाही. 


या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) आज (10 फेब्रुवारी) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. राज्यातील जागावाटपामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आठ जागांवर आग्रही आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी आणि उद्धव ठाकरे यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. 


आठ जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा


महाविकास आघाडीकडून जागावाटपावर बोलणी होत असली, तरी त्यामध्ये अजून कोणत्याही पद्धतीचा फॉर्मुला निश्चित करण्यात आलेला नाही. दुसरीकडे काँग्रेस सुद्धा अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहे. यामध्ये मुंबईमधील दोन जागांचा सुद्धा समावेश आहे. मुंबईमधील दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही आहे. शिवसेना ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही आहे. त्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई जागांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. 


'वंचित'नं दिलेल्या 39 मुद्यांच्या जाहीरनामा मसुद्यात आहे तरी काय?


दुसरीकडेत, वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीचा (MahaVikas Aghadi) घटक पक्ष म्हणून सामील करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चा केली जात आहे. मात्र, महाविकास आघाडीला वंचित आघाडीकडून सातत्याने अटी शर्ती देण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता वंचितकडून महाविकास आघाडीला 39 मुद्द्यांचा समावेश असलेला जाहीरनाम्याचा मसुदा सादर करण्यात आला आहे. या मुद्द्यांमध्ये राज्यातील संवेदनशील मराठा आरक्षणासह 39 मुद्यांचा समावेश आहे.  या मसुद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणावर सुद्धा भाष्य करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण या मुद्द्यांना सुद्धा वंचितकडून हात घालण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक नवीन मुद्दे सुद्धा या मसुद्यामध्ये समावेश करण्यात आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या