नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रामधील (Maharashtra) दौरे अचानक वाढले आहे. या नव्या वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी दोन वेळा महाराष्ट्र दौरा केल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा सुद्धा विदर्भामध्ये दौरा निश्चित करण्यात आला आहे. अमित शाह 15 फेब्रुवारी रोजी अकोला दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा असेल. 


पश्चिम विदर्भामध्ये अमित शाह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम विदर्भामध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये अमित शाह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी अमित शाह यांचा संवाद साधणार आहेत. हा दौरा निश्चित होत असतानाच 19 फेब्रुवारी रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्याकडून कोस्टल रोडचे लोकार्पण करण्यात येणार आहेत. 


पीएम मोदी दोन महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार


तत्पूर्वी, त्यांनी अटल सागरी सेतूचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र दौरा केला होता. राम मंदिर सोहळ्यापूर्वी त्यांनी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये भेट दिली होती. हा सर्व घटनाक्रम पाहता भाजपकडून आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे आयोजित केले जाच आहेत. राज्यामध्ये महायुती सरकार असलं, तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पूरक वातावरण नसल्याने भाजपच्या नेतृत्वाकडून अमित शाह आणि मोदींचा दौऱ्यांवर दौरे आयोजित केले जात आहेत का? अशीही चर्चा आहे. 


Mood of The Nation Survey मध्ये महायुतीला फटका बसण्याचा अंदाज


दुसरीकडे, इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या (Mood of The Nation Survey on Maharashtra) फेब्रुवारी 2024 मधील सर्वेमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 22 जागा मिळण्याचा अंदाज इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनमध्ये वर्तवण्यात आला आहे.  2019 मध्ये एनडीएला मिळालेल्या जागांपेक्षा तब्बल 19 जागांचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका जानेवारीमध्ये झाल्यास महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 26 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्या गटांचे स्वागत केलं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर भाजपला काही फायदा झालेला दिसून येत नाही, असेही सर्व्हेतून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या