पंढरपूर : बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवर कारवाई करत गुरुवारी सील करण्यात आली आहे. कोविड तालुका कृति समिती मार्फत पंढरपूर शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब देत होती. याची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नायब तहसीलदार कोळी, पोलीस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. 


यावेळी वात्सल्य लॅब चालक आदमिले यास अवैध रिपोर्ट तयार करताना आणि रॅपिड अँटिजेंन  टेस्ट किट सहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याला किट पुरवणारा तसेच बनावट अहवाल तयार करुन देणारा उमेश शिंगटे यालाही पकडले आहे. आदमिले व उमेश शिंगटे या दोघांनी हे काम गेल्या 2-3 महिन्यापासून करत असल्याची कबुली दिली. याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. यावरुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुह्यात अजुन कितीजण आहेत, याची चौकशी चालू आहे.


अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कोविड टेस्टिंग आपल्या रुग्णालय अथवा लॅबमध्ये केली जात नाही. याची पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आणि पॅथॉथोलॉजी लॅब चालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम यानी केले आहे. जर असे काही आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन  कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.


पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी 16 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे. मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केला आहे.