- काँग्रेस- 73
- राष्ट्रवादी काँग्रेस- 52
- जनता दल- 10
- भाजपा- 55
- शिवसेना- 26
- एमआयएम- 35
- इतर व अपक्ष- 101
मालेगावमध्ये मतदार जागृतीसाठी वासुदेव आणि कव्वाली पार्टींचा आधार
एबीपी माझा वेब टीम | 19 May 2017 08:16 PM (IST)
मालेगाव : भिवंडी, पनवेल आणि मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्वत्र पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचाराचा जोर वाढला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांना घरोघरी जाऊन त्यांची भेट घेत आहेत. तर दुसरीकडे मालेगावमध्ये महापालिकेने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वासुदेव आणि कव्वली पार्टींचा आधार घेतला आहे. मालेगाव महापालिकेची 24 मे रोजी निवडणूक होत असून, सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. मालेगाव महापालिकेसाठी एकूण 84 जागांसाठी एकूण 352 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून, सर्वच उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे महापालिकेनेही मतदार जागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. मतदारांना जनजागृतीसाठी महापालिका आणि निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. याशिवाय घरोघरी जाऊन मतदारांना मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी वासुदेव आणि कव्वाली पार्टींचा आधार घेतला जात आहे. मागील वेळेस मतदानाची कमी झालेली टक्केवारी लक्षात घेता, यंदा मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेने नेमलेले वासुदेव गल्लोगल्ली जाऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करत आहेत. तर मुस्लीम बहुल भागातील मतदारांनी कव्वाली पार्टीच्या माध्यमातून मतदानास प्रोत्साहित करत आहेत. दरम्यान, शहराचे दिवसाचे तापमान42 अंश पेक्षा जास्त असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे उमेदवारांकडून सकाळी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळनंतर प्रचार रॅली काढण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यंदा भाजपाने प्रथमच सर्व प्रभागातून मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मुस्लीमबहुल भागात कमळ फुलते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाचे मुस्लीम उमेदवारांनीही प्रचारात इतर पक्षांच्या उमेदवारांप्रमाणे आघाडी घेतली आहे. महापालिकेच्या 84 जागांसाठी एकूण 352 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.