नाशिक : अहमदनगरमधील सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालायाने निर्णय दिला.

दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाईल.

दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप राजू धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) या सोनईतील गणेशवाडीत राहणाऱ्या तिघांची हत्या केली होती.

सोनई हत्याकांडातील एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती.

कुणा-कुणाला फाशी?

  1. प्रकाश विश्वनाथ दरंदले

  2. रमेश विश्वनाथ दरंदले

  3. पोपट विश्वनाथ दरंदले

  4. गणेश पोपट दरंदले

  5. अशोक नवगिरे

  6. संदीप कुऱ्हे


सातवा आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला.

विशेष म्हणजे, फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय हा खटला सरकारी वकिलांना चालविला होता. यात 53 साक्षीदारांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सचिन घारु या मेहतर समाजातील तरुणाचं सवर्ण मुलीवर प्रेम होतं. ते लग्न करणार होते. मात्र सवर्ण कुटुंबाने कट रचून 1 जानेवारी 2013 रोजी सचिनची हत्या केली. यावेळी सचिनच्या हत्येची कुणकुण लागल्याने कुटुंबाने सचिनचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांचीही हत्या केली होती.

इतकंच नाही तर तर सचिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले होते. तर आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते.

याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना अटक केली होती.

याप्रकरणी सीआयडीने 7 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यापैकी 6 जणांना न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली दोषी धरलं, तर अशोक फलकेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

आज अखेर दोषी असलेल्या सहाही जणांना फाशीची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली.

संबंधित बातम्या :

सोनई हत्याकांड : सहा दोषींना आज शिक्षा सुनावणार

सोनई हत्याकांड: राक्षसांना मृत्यूदंड द्या, निकम यांची मागणी

सोनई हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी

बहुचर्चित सोनई हत्याकांडप्रकरणी 6 जण दोषी