मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) इंडिया आघाडीमध्ये (India Aghadi) सहभागी झाल्याचे जाहीर केले. ही निव्वळ धूळफेक आहे.  9 जानेवारी 2024 ला दिल्लीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीची कल्पना आम्हाला होती. आमच्या सूत्रांकडून आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल चर्चा झाल्याचे समजले. पण निश्चित काय निर्णय झाला ते समजले नाही. जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला अधिकृत आमंत्रण येत नाही किंवा जागा वाटपाच्या चर्चेत बोलावत नाहीत, तोपर्यंत या बातमीत काहीही तथ्य नाही, असा खुलासा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाअध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केला आहे. 


वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचीच आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू. मात्र, दिल्लीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत नेमकी काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती आमच्याकडे आलेली नाही. त्यामुळे, वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्याचा संजय राऊत यांचा दावा निव्वळ धूळफेक असल्याचं रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक अधिकृत पत्रक काढण्यात आले आहे. 




काय म्हणाले होते संजय राऊत...


इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. सर्वच जागांवर थेट चर्चा झाली आहे. जवळपास यावर सर्वांची सहमती झाली आहे. कुणाचे किती आकडे याची माहिती नंतर देण्यात येईल. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसह इंडीया आघाडीत आम्ही सहभागी करून घेतलं असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. 


नाना पटोले यांची प्रतिक्रिया...


महाविकास आघाडीच्या जागावाटप बाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील प्रतिक्रिया आली आहे." भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा आमच्या सर्वांचा उद्देश आहे. त्यासाठी जागावाटप करतांना जे काही करणं शक्य आहे ते आम्ही करणार आहोत. आमचा फॉर्म्युला जवळपास अधिच ठरला आहे. ज्या ठिकाणी जो पक्ष विजयी होईल अशी जागा त्या पक्षाला देण्याचं आमचं ठरलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप बाबत कोणतेही अडचण येणार नाही. तसेच एक-दोन जागांवर काही अडचण असल्यास त्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे नाना पटोले म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Shiv Sena UBT VBA meeting : मविआमध्ये जागा वाटपाचं ठरलं नाही, मग ठाकरे गट आणि वंचितच्या बैठकीत काय झालं?