सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात एका हॉटेल कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 1 ते दीड महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. मोहोळ तालुक्यातील कन्या प्रशाला चौकातील हॉटेल रूची हे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बंद होते. हॉटेलच्या मुळ मालकाने हे हॉटेल इतर दोघांना चालविण्यास दिले होते. 24 मार्चपासुन लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद होते. यादरम्यान रविवारी म्हणजेच, 30 ऑगस्ट रोजी सकाळी आसपासच्या नागरिकांनी दुर्गंधी येत असल्याची माहीती पोलीसांना कळविल्यामुळे पोलीस त्या परिसरात गेले असता हॉटेल रुचीच्या किचनमध्ये लोखंडी अँगलला पडद्याच्या सहाय्याने गळफास घेऊन सडून खाली पडलेला मृतदेह आढळून आला.


जवळ सापडलेल्या कागदपत्रावरून संबधित इसमाची ओळख पटली असून त्याचे नांव कुलदिपसिंग सोलसिंग मरावी असे असून तो मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. हॉटेल बंद पडल्यानंतर या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण तीन कामगारांपैकी दोघेजण ऑनलाईन पास काढून आपआपल्या गावी परत गेले होते. तर मृत कुलदिपसिंग मरावी हा मात्र हॉटेलमध्येच राहत होता. हॉटेलमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नधान्य शिजवून तो तिथेच खात होता. मात्र आज सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गुलदसत्यात आहे.


दरम्यान हा मृतदेह अंत्यत धक्कादायक अवस्थेत आढळला आहे. मृतदेह हा संपूर्णपणे कुजल्याने शरीर आणि मुंडके हे आपोआप गळून बाजूला पडले होते. मृतदेहाच्या अवस्थेवरुन जवळपास एक ते दीड महिन्याआधी मृत्यू झालं असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी दिली. हॉटेल हे नागरी वस्तीपासून दूर असल्याने कोणाचेही त्या ठिकाणी लक्ष गेले नाही. मागील जवळपास 5 महिन्यांपासून हॉटेल बंद असल्याने त्याठिकाणी कोणीही जात नव्हते. आज हॉटेल परिसराजवळून जाणाऱ्या व्यक्तीला दुर्गंधी आल्याने त्याने ही माहिती पोलिसांनी कळवली. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आल्याचे देखील पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले.


लॉकडाऊनच्या काळात अनेक जण नैराश्येत अडकले होते. व्यवसाय उद्योग बंद असल्याने उपासमारीची वेळ देखील अनेकांवर आली होती. मात्र मृत कुलदिपसिंग मरावी याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय आहे. याबाबत सविस्तर तपास करण्यात येईल अशी माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली. याबाबत पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर . बाडीवाले हे अधिकचा तपास करीत आहेत.


दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक बजरंग बाडीवाले यांच्या फिर्य़ादीवरुन आणखी एक गुन्हा सायंकाळी दाखल करण्यात आला आहे. सपोनि बजरंग बाडीवाले यांनी आत्महत्येचा कारणांचा तपास करणेकामी हॉटेलचे चालक गाजरे यांना फोन केला होता. मात्र संध्याकाळच्या सुमारास छाया जगदाळे, संदिप देशमुख आणखी एक व्यक्ती पोलीस स्थानकात आले. तुम्ही गाजरे यांना फोन का केला? त्यांचा काय संबंध आहे? आम्ही देशमुख घराण्यातील माणसे आहोत, असे म्हणत सपोनी बजरंग बाडीवाले यांच्या शर्टची गच्ची पकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हणत सपोनी बाडीवाले यांच्या फिर्यादीवरुन छाया जगदाळे, संदिप देशमुख आणि एका अनोळखी इसमा विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात कलम 353, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीने मित्राचाच आवळला गळा; 24 तासांत दोन आरोपीला बेड्या


संतापजनक... बापाकडून अत्याचार, अल्पवयीन मुलगी गरोदर, दिला बाळाला जन्म, नराधम पित्याला बेड्या