मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणीसुद्धा वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आलं.

अकोला

अकोल्यातही आज वंचित बहूजन आघाडीच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएमविरोधात आज वंचित बहूजन आघाडीनं राज्यव्यापी घंटानाद आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी 'ईव्हीएम हटाव, देश बचाव’ या घोषणांनी परिसर निनादून गेला. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी अकोल्यात ईव्हीएम घोळाचा प्रकार समोर आला होता.

परभणी

ईव्हीएम विरोधात  वंचित बहुजन आघाडी परभणीत जिल्हाधिकारी कायालयासमोर वंचित  कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन घंटानाद आंदोलन केले. यावेळी पुढील सर्व निवडणुका या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरच घेण्याची मागणी  आंदोलकांकडून करण्यात आली

हिंगोली

हिंगोलीतील तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात भारिपचे घंटानाद आंदोलन करण्यात आले. हिंगोली मधल्या कळमनुरी, सेनगाव, औंढा, वसमत तहसील कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघातर्फे ईव्हीएम विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आलं. तसेच ईव्हीएम मशीन हटाओ, देश बचाओ असा नारा ही या आंदोलनात देण्यात आला. यावेळी आंदोलनात महिलांनी देखील सहभाग घेतला होता.

उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. तसेच ईव्हीएम मशीन प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नसून निवडणूक आयोग देखील सत्ताधाऱ्यांच्या हाताचा बाहुले झाले असल्याची टीका यावेळी करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर

वंचित बहुजन आघाडी तर्फे अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात धरणे आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी देखील केली.

वाशिम

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळपासून ईव्हीएम विरोधात घंटानाद  आंदोलन सुरु केले आहे . जुन्या बॅलेट पेपर पद्धतीचा वापर करुन मतदान प्रक्रिया राबवावी आणि लोकशाही मजबूत करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.

जालना

जालना येथे देखील बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर ईव्हीएमविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. आज दुपारी शेकडो आंदोलन कर्त्यांनी ठिय्या मांडून हे आंदोलन केले.

वर्धा

वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी एव्हाईम हटावची मागणी करत निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अडव्होकेट धनराज वंजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

पालघर

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करुन ईव्हीएम मशीनचा विरोध करण्यात आला. 'ईव्हीएम हटाव देश बचाव' अशी घोषणाबाजी करत, यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सोलापूर

सोलापूरातही वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ आणि समविचारी पक्षांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठी घंटा वाजवत नाद करण्यात आलं. तसेच दगडावर निवडणूक आयोग लिहित निवडणूक आयोगाला दगडाची उपमा देण्यात आली. निवडणूक आयोग हे कोणाचं ही ऐकत नसून दगड एकावेळेस सामन्यांचे ऐकेल मात्र आमचं ऐकणार नाही असे म्हणत निवडणूक आयोगाच्या कारभाराचा  निषेध नोंदविण्यात आला.