Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणला 14  जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वारजे पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या गुन्ह्याप्रकरणी ही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये कस्पटे कुटुंबीयांना धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शशांक हगवणेला देखील 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खोटे कागदपत्र सादर करत शस्त्र परवाना मिळवल्या प्रकरणी शशांक हगवणे याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

नेमकं प्रकरण काय?

वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Death Case) प्रकरणी हगवणे बंधुंच्या अडचणीत आणखी वाढ होत असल्याचं चित्र आहे. वैष्णवीचा नवरा शशांक आणि दीर सुशील यांनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे याच्याविरोधात वारजे तर सुशील हगवणे कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हगवणे कटुंबीय पुणे ग्रामीणमधील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात. त्यामुळं त्यांनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलीसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलीसांनी दोघांचेही अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर दोघांनी ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते दिले. त्यासाठी ते भाड्याने राहत असल्याचे कागदपत्रे दाखवण्यासाठी भाडे करार तयार केला. शशांकने वारजेला तर सुशीलने कोथरुडला रहात असल्याचा पत्ता सादर केला. त्याआधारे पुणे पोलीसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी करण्यात आली. याप्रकरणी दोघां भावांवरती गुन्हा दाखल आहे, मात्र, आता या प्रकरणामध्ये हगवणेंचा पाहुणा आणि शशांक, सुशील यांचा मामा जालिंदर सुपेकर यांचं नाव देखील समोर आलं आहे.

कोण आहे निलेश चव्हाण?

वैष्णवी हगवणेचे नऊ महिन्यांचे बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होते. त्या काळात बाळाचे खूप हाल झाले. हे प्रकरण समोर आल्यानंतर वैष्णवीचे बाळ तिच्या कुटुंबीयांना द्यावे, अशी मागणी केली जाऊ लागली. तसा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर निलेशने हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सोपवले होते. मात्र मधल्या काळात बाळाच्या सुरक्षेस धोका निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेची नणंद करीश्मा हगवणेचा मित्र आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! शशांक अन् लता हगवणेंच्या अटकेसंदर्भात न्यायालयाची परवानगी; येरवडा तुरुंगातून पोलीस आई-लेकाचा ताबा घेणार