Vaibhav Naik : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप नेते तथा मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची गुप्त भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. मात्र आमदार वैभव नाईक यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट का घेतली याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 


वैभव नाईक म्हणाले की, रवींद्र चव्हाण यांनी काल दिलेले स्टेटमेंट म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील अंतर्गत धूसफुस बाहेर आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर भाजपाला धडकी भरली आहे. भाजपाला (BJP) लोकसभेला येथे उमेदवार मिळत नसल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. मला अनेक पक्षाच्या ऑफर होत्या. मंत्रिपदाच्याही ऑफर होत्या. मात्र आम्ही पक्षाशी निष्ठावंत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 


लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपाकडून सुरु


ते पुढे म्हणाले की, माझ्या सुद्धा चौकशी सुरु आहे, मी २० वर्षाचा हिशोब समोर ठेवला, १ रुपयांचा भ्रष्टाचार ते काढू शकले नाहीत. प्रामाणिक माणसाला बदनाम करायचे, जर तो आपल्याकडे येत नसेल तर चौकशी लावण्याचे काम सुरु आहे. आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करायचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम हे भाजपा करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  


...म्हणून घेतली रवींद्र चव्हाणांची भेट


रवींद्र चव्हाण यांचा नियोजित कणकवली दौरा होता. त्यात शासकीय विश्रामगृह येथे आम्ही उड्डाणपुलाच्या कामा संदर्भात त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. त्यांनी त्यात काही बदल सुचवले होते. पण हे काम लवकर पूर्ण व्हावं, अशी विनंती मी त्यांना केली आहे. रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातील वादामुळे काही विकास कामे त्यांना करता येत नाहीत. माझी भेट विकास कामांसाठी होती, आणि ही खुलेआम भेट होती. बंद दाराआड कुठलीही चर्चा झाली नाही. त्यांना जनाधार राहिला नाही म्हणून अशा खोट्या बातम्या पसरून बदनामी केली जात आहे, असे स्पष्टीकरण वैभव नाईक यांनी दिले आहे. 


वैभव नाईकांच्या भेटीवर काय म्हणाले रवींद्र चव्हाण?


सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजन समितीचा सर्व कामाच्या आढावा संदर्भातील एक बैठक घेण्यासाठी मी आलो होतो.  कोकणकन्या रेल्वे उशीरा आल्यामुळे कणकवली येथील गेस्टहाऊसमध्ये आरामास थांबलो होतो. त्यावेळी सर्व कार्यकर्तेही आले होते. पण अचानक वैभव नाईक अचानक आले. त्यांची आणि माझी भेट झाली. वर्तमानपत्र आणि न्यूजवर अनेक उलटसुटल बातम्या सुरु आहे. भाजप आणि संघटनात्मक वाढीसाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. अनेक लोकप्रतिनिधी माझ्या संपर्कात असतात. या संदर्भात वैभव नाईक यांनी याबाबत अनेकदा माझ्याशी चर्चा केली. कोकण या विषयावर नारायण राणेंना विचारल्याशिवाय यासंदर्भातील कोणताही निर्णय मी करु शकणार नाही. त्याशिवाय इतर चर्चाही झाल्या. बंद दाराआढ काय झालं, हे जर सांगितलं नाही तर उचीत ठरणार नाही, त्यामुळे मी हे स्पष्ट करतोय, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


जे कुणबी त्यांना आधीपासूनचे आरक्षण, नोंदी नसलेल्या मराठ्यांना सरसकट स्वतंत्र आरक्षण, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही!