कोल्हापूर : लोकसेवेचे स्वप्न पाहणारी कोल्हापुरातील तरुणी आता थेट जनसेवेत उतरत आहे. प्रियांका पाटील यूपीएससीच्या मैदानातून जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरली आहे. कुटुंबीयांच्या आग्रहाखातर दिल्ली ते गल्ली असा उलटा प्रवास करणाऱ्या कोल्हापूरच्या प्रियांकाला मिनी मंत्रालयाची दारं खुणवू लागली आहेत. उच्चशिक्षित तरुणीच्या राजकारणातील प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले गावात राहणारी प्रियांका पाटील सध्या दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करते. जिल्हाधिकारी होण्याची प्रियंकाची इच्छा आहे. चार दिवसांपूर्वी अभ्यास करताना तिला चुलते बाबासाहेब पाटील यांचा फोन आला आणि तू जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभी राहणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
काही वेळ विचार करुन प्रियांकाने आपला होकार कळवला आणि प्रियांका दिल्लीहुन थेट कोल्हापुरात दाखल झाली. खरंतर बॉटम टू टॉप अशी विकासाची धारणा हवी, मात्र आपल्या देशात याच्या अगदी उलट चित्र आहे. 'खेड्याकडे चला' असं केवळ बोललं जात असताना त्याकडे वाटचाल मात्र कोणी करताना दिसत नाही.
सिलेक्टेड असो की इलक्टेड, मला लोकसेवा करायची होती आणि तेच स्वप्न घेऊन मी आज राजकारणात आले आहे. तुम्ही मला संधी दिलीत, तर संधीचे सोने करेन असे सांगत प्राचारात उतरलेली प्रियांका पाटील संपूर्ण कोल्हापुरात उत्सुकतेचा विषय ठरली आहे.
खरंतर घरी राजकारणाचे बाळकडू असताना प्रियांकाने मात्र जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पहिले होते. फक्त स्वप्न पाहत न थांबता ती दिल्ली गाठून यूपीएससीची पहिली परीक्षा पासही झाली आहे. मुख्य परीक्षेच्या अभ्यासात व्यस्त असताना तिला अचानक एके रात्री घरचा फोन आला नेहमीप्रमाणे येणारा फोन त्या दिवशी मात्र वेगळा ठरला. घरच्यांनी अनपेक्षितपणे जिल्हा परिषद लढवण्याची संधी दिली आणि
काही क्षण मी स्तब्ध झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसेवेची संधी मिळत असल्याने मी तयार झाल्याचं प्रियांकाने सांगितलं.
प्रियांका जिल्हा परिषदेच्या असुर्ले मतदार संघातून निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभी आहे. सुशिक्षित उमेदवार असल्याने सगळे तिचं स्वागत करत असल्याचं तिचे चुलते बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही कमी शिकलेल्या लोकांची निवडणूक, असा सर्वसाधारण समज आहे, त्यामुळे गावं विकासापासून दूर आहेत. जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रियांकाने या निवडणुकीत लढण्याची तयारी दाखवल्याने या निवडणुकीत शिकलेली आणि तरुण पिढी आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.
प्रियांकाने सध्या प्रचारावर भर दिला आहे. लोकांच्या गाठीभेटी घेणे, थेट लोकांच्यात मिसळणे ही तिची खासियत आहे. कोल्हापूरच्या विकासाचे मॉडेल आपण देऊ असा संकल्प तिने केला आहे. मतदार आपल्याला विकासासाठी निवडून देतील, असा विश्वास प्रियांकाला वाटतो. मात्र मतदार तिला मिनी मंत्रालयाच्या अभ्यासात पास करणार का? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.