पंढरपूर : जिद्द आणि चिकाटी असेल, तर मार्ग नक्कीच मिळतो, हे पंढरपूरच्या संतोष माळीने दाखवून दिलं. वडिलांच्या निधनानंतर नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेसाठी धडपडत असलेल्या संतोषच्या मदतीला त्याचे मित्र धावून आले आणि त्यांच्याच मदतीमुळे संतोषने यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं.


संतोष सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. प्राथमिक शाळेपासून इंजिनिअरिंगच्या पदवीपर्यंत त्याचं सर्व शिक्षण पंढरपूरमध्येच झालं. स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर कॅम्पसमधून बंगळुरुतील मोठ्या कंपनीत त्याची निवड झाली.

संतोषचे वडील पाटबंधारे विभागात नोकरीला होते. या काळातच संतोषने नोकरी सोडून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्ष तो अभ्यासासाठी जाऊन राहिला. पण दैवाच्या मनात काही औरच असतं, असं म्हणतात. अचानक संतोषला वडिलांच्या निधनाची बातमी आली आणि तो दिल्ली सोडून पुन्हा पंढरपूरमध्ये आला.

यानंतर मात्र त्याने पुन्हा एकदा गांभीर्याने अभ्यास सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी आर्थिक अडचणी सुरु झाल्याने त्याने मुंबईतील मामाकडे जाऊन राहणं पसंत केलं. वसई विरार येथील महापालिकेच्या वाचनालयात जाऊन तेथील पुस्तकांच्या जोरावर पुन्हा त्याने जोरदार तयारी सुरु केली. मात्र प्रत्येक वेळेला आर्थिक अडचणी सातत्याने त्याच्यासमोर उभ्या राहू लागल्या.

घरच्या परिस्थितीमुळे कुटुंबाकडून मिळणारी आर्थिक मदत पुस्तकं खरेदी आणि तयारीसाठी कमी पडत होती, तरीही संतोषने जिद्द सोडली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्रांकडून आर्थिक मदत घेत त्याने आपली तयारी सुरुच ठेवली. अखेर UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि संतोष देशात 612 वा रँक मिळवून यशस्वी झाला.

संतोषच्या यशामुळे त्याच्या आईला अश्रू अनावर झाले आहेत. संतोषच्या निकालाचा आनंद त्याच्याइतकाच त्याला मदत करणाऱ्या मित्रांनाही झाला आहे.

स्पर्धा परीक्षेत जिद्द, प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नात सातत्य असेल तर कोणतीच अडचण तुम्हाला यशापासून दूर ठेवू शकत नसल्याचं संतोष सांगतो. यावेळी आयएएस निवडता येणार नसल्याने पुन्हा आपले प्रयत्न सुरु ठेवणार असल्याची जिद्द देखील त्याने आजही ठेवली आहे.