मुंबई : सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने कुणी गावाकडे, कुणी थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी, तर कुणी देवस्थानांकडे जाताना दिसत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांची मांदियाळी दिसते आहे.


विठ्ठल मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप

सलग सुट्ट्या असल्याने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पर्यटक आणि भाविकांच्या गर्दीने पंढरपूर गजबजून गेले आहे. आज विठ्ठल मंदिराला यात्रेचे स्वरुप आले आहे.

आजपासून चार दिवस सलग सुट्ट्या आल्याने राज्यभरातून शहरी पर्यटक पहाटेपासून पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. शहरातील हॉटेल व लॉज भरले आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सांगली आणि कोल्हापूरसह अनेक कुटुंबं या सुट्ट्यांमध्ये देवदर्शनासाठी बाहेर पडले आहेत.

या सुट्ट्यांमुळे आज पहिल्याच दिवशी विठुरायाच्या दर्शनाची रांग सात मजली दर्शन मंडपात पोहोचली असून, तीन ते चार तासात भाविकांचे दर्शन होत आहे. आज दुपारपासून गर्दीची संख्या वाढतच जाणार असल्याने मंदिर प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे.



प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कविता लाड, बांधकाम व्यवसायिक जयंत म्हैसकर यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांनीही पंढरीत येऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. जयंत म्हैसकर यांनी मंदिरासाठी 21 लाख रुपयांची देणगी दिली. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी उद्योगजक जयंत म्हैसकर आणि अभिनेत्री कविता लाड यांचा सत्कार केला .

विदर्भाच्या पंढरीतही गर्दी

सलग चार दिवसांच्या सुट्या आल्याने विदर्भाची पंढरी शेगाव येथे भक्तांची मांदियाळी सुरु झाली आहे. शेगावात भक्त येणे सुरु झाले असून, गजानन महाराज यांचे दर्शन आणि आंनद सागर हे भक्तांचे आकर्षण असते.

शिर्डीतही साईभक्त दाखल

शिर्डीतही साईभक्त येण्यास सुरुवात झाली आहे. आज नेहमीप्रमाणेच गर्दी असली, तरी येत्या तीन दिवसात मोठ्या संख्येने साईभक्त दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

उन्हाचा तडाका मोठा असल्यने लोक थंड हवेच्या ठिकाणे जाणं पसंत करत आहेत, मात्र तरीही देवस्थानांच्या दिशेने येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालेली नाही.