औरंगाबाद : औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील मळीवस्ती या छोट्याशा वस्तीवर राहणाऱ्या शेख सलमान उमर पटेल याने यूपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. यूपीएससीमध्ये पास झाल्याचा फोन आला त्यावेळी सलमान शेतामध्ये आईसोबत पुदिना कापत होता... अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सलमानने हे यश मिळवलं आहे.


सलमान पटेलला यूपीएससीमध्ये 339 वा रँक मिळाला आहे. सलमानचा सत्कार करण्यासाठी त्याच्या घरासमोर रांगा लागल्या आहेत. सलमानचे वडील उमर पटेल एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. दोन खोल्यांचं घर आणि कुटुंबाची दोन एकर शेती.
यूपीएससीचे यशवंत : कसगीचा गिरीश बदोले राज्यात अव्वल

सलमानने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलं. तर त्याचं महाविद्यालयीन शिक्षण मौलाना आझाद महाविद्यालयात झालं. लहानपणापासूनच मोठा अधिकारी होण्याचं सलमानचं स्वप्न होतं. यूपीएससीच्या चौथ्या प्रयत्नानंतर त्याला हे यश मिळालं. त्यासाठी दिवसातील आठ-आठ तास त्याने अभ्यास केला. सुरुवातीला पुणे आणि त्यानंतर दिल्लीमध्ये त्याने क्लासेस लावले.

मुलाच्या यशामुळे आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत आहेत. कालपर्यंत आपल्यासोबत शेतात पुदिना कापणारा आपला पोरगा अधिकारी झाल्यामुळे त्यांचे शब्दही फुटत नव्हते.

गरिबीमुळे ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षण देण्याचे सलमानचे प्रयत्न आहेत. त्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी 'एबीपी माझा'कडून शुभेच्छा