Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सतत बदनामी केल्याचा आरोप करत नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष तेंजिंदर तिवाना यांच्यातर्फे तक्रार दाखल केली गेली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केल्याच्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले आहेत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात नाना पटोले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली असून कलम 153 बी, 500, 504, 505(2), 506 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तेजिंदर सिंग तिवाना यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली. नाना पटोले यांच्यावतीनं मात्र या सर्व आरोपांचा विरोध करत आपण पंतप्रधानांनविरोधात असं कोणतंही वक्तव्य केलेलं नसल्याचा दावा कोर्टात केला. दोन्ही बांजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं यावरील निकाल राखून ठेवत तो 11 फेब्रुवारीला जाहीर करण्याचं निश्चित केलं आहे.
पंतप्रधान हे देशातील घटनात्मक पद आहे आणि या पदाचा अपमान करणं हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आपला निषेध व्यक्त केला आहे. मुंबईत भाजपतर्फे 18 जानेवारी रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन केलं गेलं आणि याप्रकरणी गुन्हाल दाखल करण्याची मागणी केली गेली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की, याप्रकरणी चौकशी करून कारवाई करू मात्र अद्याप राज्यात कुठेही गुन्हा नोंदवला गेलेला नाही. त्यामुळे अखेर भाजप युवा मोर्चातर्फे न्यायालयाचा दरवाजा ठोठावला गेला आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
भंडारा जिल्ह्यातील प्रचारसभेत नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. याा एक व्हिडीओ व्हायरल झाला. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.