Unseasonal Rain In Maharashtra:   राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. या अवकाळी पावसाचा उन्हाळी पिकांना फटका बसणार आहे. महाराष्ट्रात उद्यापासून पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 


वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात आज पुन्हा गारपीटसह पाऊस झाला. अवकाळी पावसाचा उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अचानक होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. देवळी तालुक्याच्या अनेक भागात गारपीटही झाली आहे. वर्धा, सेलू, कारंजा व हिंगणघाट या भागात पावसाच्या सरी बरसल्या.


परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायचे नाव घेत नाही. दोन दिवसानंतर परत एकदा परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये वादळी वारे गारांसह जोरदार पाऊस बरसला आहे.  लिंबगाव चुडावा तसेच पूर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय यामुळे काही ठिकाणी ज्वारीसह ऊस ही आडवा पडला आहे.


 


केळी बागांचेही नुकसान


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा जवळा-पांचाळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा पाऊस झाल्याने याचा फटका केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. वादळी वारा, गारांच्या पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात. शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक खर्च करून ह्या बागा जोपासल्या. परंतु या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस आणि गारपीठ हजेरी लावली. अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली असून केळी उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. 


बाजार समितीमधील शेतमालाचे नुकसान


जिल्ह्यात पडलेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसात भिजला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच शेतकऱ्यांचे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.


उद्याही पावसाचा इशारा 


महाराष्ट्रात उद्यापासून पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात उद्या अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये पुणे, नाशिक, साताऱ्यासाठी तीव्र इशारे देण्यात आले आहेत. विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.