Unseasonal rain all over Maharashtra : राज्यात आज सर्वदूर अवकाळी पावसाने धूमशान घातले. अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली, तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर  जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. 


गंगापूर तालुक्यात जोरदार वादळी वारे; आंबा पिकाचे मोठे नुकसान


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. उतरणीसाठी आलेला आंबा मोठ्या प्रमाणावर वादळामुळे गळत असून, उन्हाळी मका, बाजरी, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. 


साताऱ्यात पावसाची हजेरी 


सातारा जिल्ह्यात कोयना, महाबळेश्वर पाचगणी वाई शिरवळ परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भर दुपारी महाबळेश्वरच्या गजबजणाऱ्या बाजारपेठात शुकशुकाट जाणवला. अनेक ठिकाणी पर्यटकांनी मात्र पावसाचा आनंद घेतला.


खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस 


पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार आलेल्या पावसाने उकाड्या पासून नागरिकांची सुटका झाली. मात्र, वादळी पावसाने शेतातील उन्हाळी पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.


रायगड जिल्ह्यातही पावसाची हजेरी 


रायगड मधील माणगाव तालुक्यातील लोणेरे परीसरात गारांचा पाऊस कोसळला. जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. खामगाव, शेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. महाड,माणगाव, पोलादपूर, म्हसळा श्रीवर्धन भागात अवकाळी पाऊस झाला. दुपारी तीनपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत असताना अचानक रायगडच्या या भागात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि अचानक अवकाळी पाऊस कोसळू लागला. 


रायगडमधील कर्जत खोपोली, खालापूर तालुक्यांत देखील पाऊस कोसळला. या परिसरातील विट भट्टी व्यवसायिक मात्र संकटात सापडले आहेत. नुकत्याच विटांचा थरांचा ढीग जाळण्यासाठी रचण्यात आला होता. मात्र, अवकाळीने या व्यवसायिकांवर मोठं संकट निर्माण केलं आहे.


लातूरमध्ये पावसाचे तुफान 


लातूर शहर आणि परिसरात दुपारी तीन वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. वारे आणि विजेच्या गडगडाटात पाऊस झाला. अर्धा तासापेक्षा अधिक काळ पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले. या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. जिल्ह्यातील अनेक भागात लामजना, किल्लारी, औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळल्या. लातूर शहर आणि परिसरात मात्र पावसाने चाळीस मिनिटांपेक्षा अधिक काळ सरी कोसळल्या. 


रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत


रत्नागिरीमधील खेडमध्ये देखील चक्रीवादळ आणि झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. खेड भरणे मार्गावर पंचायत समितीसमोर देखील महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळल्यामुळे खेड भरणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. खेडसह चिपळूणमधील ग्रामीण भागात चक्रीवादळ झाल्याने आंबे गळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या