लातूर : लातुरातील प्रसिद्ध अशा ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या झाली आहे. रात्री एक वाजता ते आपल्या घराकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ त्यांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यात एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अविनाश चव्हाण स्वत:च गाडी चालवत होते. यावेळी गाडीत ते एकटेच होते. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या.
चव्हाण यांच्यावर हल्ल्यासाठी हल्लेखोर दबा धरुन बसला होता की त्यांचा पाठलाग करत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, डीवायएसपी हिंमत जाधव, डीवायएसपी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुधाकर बावकर, पीआय केशव लटपटे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी हजर होते.
लातूर हे शैक्षणिक क्षेत्रात नावारुपाला आले आहे. यामुळे येथे मोठ्याप्रमाणात खासगी शिकवणी वर्ग ही चालतात. मागील काही वर्षात येथे अविनाश चव्हाण यांचे स्टेप बाय स्टेप क्लास चालवतात. काही दिवसापूर्वी त्यांनी एक कोटीचे बक्षीस क्लासमधील मुलांना दिले होते. पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट बक्षीस वाटणार होते.
नांदेडमध्येही त्यांनी आपल्या क्लासची शाखा उघडली होती. या घटनेची माहिती येथील शैक्षणिक क्षेत्रात कळताच हळहळ व्यक्त केली जात. या घटनेची माहिती मध्यरात्री सर्व शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि अनेक जणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
अतिशय उच्च्भ्रू लोकवस्ती असलेल्या भागात अविनाश चव्हाण यांची हत्या झाली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. हत्येचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.