नागपुरातील गुजरात लॉजमध्ये महिलेची गळा आवळून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 17 Nov 2016 11:30 PM (IST)
नागपूर : कॉटन मार्केट परिसरातील गुजरात लॉजमध्ये एका महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची घटना घडली आहे. अफसाना परवीन पठाण असे मृत महिलेचे नाव असून, ती 35 वर्षीय होती. अफसाना नागपुरातील भिवापूरमधील रहिवाशी असल्याची माहिती मिळते आहे. अफसानाच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयिताचे वय 27 वर्षे आहे. दरम्यान, नागपुरात गेल्या 24 तासात दोन महिलांच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. सकाळीच महादूला परिसरात प्रमिला कानफाडे या महिलेची राहत्या घरी हत्या झाली. त्यानंतर गुजरात लॉजमध्ये 35 वर्षीय अफसाना या महिलेची गळा आवळून हत्या झाली. गेल्या काही महिन्यांपासून नागपुरातील गुन्हेगारी प्रकर्षाने समोर येते आहे. सर्वसामान्य नागपूरकर गुन्हेगारीला हैराण झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे, असा प्रश्न आता विचारला जातो आहे.