Gopichand Padalkar On Sharad Pawar and Anil Parab : एसटी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली म्हणून शरद पवारांना चर्चा करावी लागली, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. एसटी कृतीसमितीसोबत शरद पवार यांनी काल (सोमवार) परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. तसेच, पवारांच्या या भूमिकेवर भाजपचे आमदार राम कदम यांनीही टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज शरद पवारांकडे सोपवला आहे का? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली म्हणून शरद पवारांना चर्चा करावी लागली : पडळकर
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी अजूनही काही एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत. अशातच काल (सोमवारी) शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी बैठकीनंतर दिली. अशातच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांना एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच महसुलात घट झाल्यानेच शरद पवार चर्चा करण्यास भाग पडले, असा दावा केला. ते म्हणाले की, "एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिला यासाठी मी अभिनंदन करतो. कोणत्याही युनिअनची सभासद फी भरली नाही, महसुलात घट आणली त्यामुळेच शरद पवारांना तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडलं."
यासंदर्भात गोपीचंद पडळकरांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ते म्हणाले की, "#एसटी_कर्मचाऱ्यांच्या एकजूटीमुळं शरद पवारांना खुलेआम चर्चा करण्यास भाग पडलं. अनिल परब इतर दरवाजे ठोठावण्यापेक्षा आझाद मैदानात मराठी एसटी कामगारांशी चर्चा का करत नाहीत? माझ्या विनंतीचा नाही तर किमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा."
"अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात, त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाही?" असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
"अनिल परब यांनी स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल, जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. तसंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पावलं पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा.", असं पडळकर म्हणाले.
एसटीचा संप मिटला, पण विलिनीकरण होणार की नाही, शरद पवार म्हणाले...
एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार शरद पवारांनी कालच्या बैठकीत थेट भाष्य केलं. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. एसटीची बांधिलकी ही प्रवाशांशी आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही."
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ST Strike : एसटीचा संप मिटला, पण विलिनीकरण होणार की नाही, शरद पवारांनी थेट सांगितलं!
- St workers strike : कालच्या बैठकीबाबत नेमकं काय म्हणाले एसटी कृती समितीचे सदस्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह