लातूर : शिवजयंतीचे औचित्य साधून लातूरमध्ये तब्बल अडीच एकरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विश्वविक्रमी थ्रीडी रांगोळी साकारण्यात आली आहे.

दरवर्षी शिवजयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात येते. मात्र यावर्षीची शिवजयंती आगळया-वेगळया पध्दतीने साजरी करुन शिवाजी महाराजांच्या विचाराचा नावलौकिक जगभरात व्हावा यासाठी शिवमहोत्सव समिती आणि अक्का फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून  छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली.



मंगेश निपाणीकर व त्यांच्या टीमने या रांगोळीसाठी तब्बल ५० हजार किलो विविध रंगाचा वापर केला. तब्बल ७२ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही रांगोळी पूर्ण झाली. यासाठी जिल्हाभरातून १०० स्वयंसेवक आणि रांगोळी कलाकार काम करत होते. यापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १० हजार चौरस फूट जागेवर रांगोळी साकारण्यात आल्याचा विक्रम नोंद आहे. मात्र, क्रीडा संकुलाच्या मैदानावर साकारण्यात आलेली ही रांगोळी तब्बल अडीच एकर म्हणजेच १ लाख चौरस फूट जागेत साकारण्यात आलेली आहे.

या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद व्हावी याकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले निकषही पाळण्यात आलेले असून या रांगोळीची नोंद नक्कीच गिनीज बुकमध्ये होईल असा विश्‍वास आयोजकांना वाटतो. दरम्यान, ही रांगोळी पाहण्यासाठी लातूरकरांनी देखील मोठी गर्दी केली आहे.