सांगली : मोबाईलचे वेड आजकाल सर्वांना किती लागलंय हे सांगायला नको. दिवसाचे बहुतांश तास मोबाईलवर आपण असतो, शिवाय गाडीवर , कार चालवताना देखील फोन वाजला की आपण न थांबता मोबाईलवर बोलतचं आपण वाहन चालवत असतो. हे झाले माणसाचे.... सांगलीतील तासगाव मधील सावर्डेमधील उमेश जाधव यांच्याकडे असलेल्या बैलजोडीला देखील चक्क मोबाईलच्या रिंगटोन वेड आहे.


तासगाव तालुक्यातील सावर्डे मधील शेतकरी उत्तम जाधव आजही घरच्या बैलांच्या सहाय्यने शेती करतात. लहानपणापासून या बैलाचा सांभाळ केल्याने जाधव याचे बैलांवर खूप प्रेम. तशी ही बैलजोडी देखील देखणी, धष्टपुष्ट...एकाचे नाव सोन्या, दुसऱ्याचे हरण्या. पण या बैलजोडीला एक सवय आहे आणि ती जर आपण पाहिली तर माणसापेक्षा जनावर शहाणी असे याचा प्रत्यय आपल्याला येतो. बैलगाडीला या बैलांना जुंपलेले असो किंवा कुळवाला अथवा पेरणीवेळी..मालकाच्या मोबाइलची रिंग वाजली की सोन्या-हरण्या जाग्यावरच थांबतात. यामागचे जर कारण पाहिले तर या बैलजोडीला ही सवय लागलीय असे बैलाचे मालक सांगतात.


मालकाच्या मोबाईलची रिंग वाजली की ही बैलजोडी जागेवर थांबते. जणू या बैलांना ही सवयच लागली आहे. मालकाने मोबाइल वापरायला सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीच्या काळात मोबाईलची रिंग वाजली की, मालक बैलाचे कासरे थोडेसे ओढायचा ही सवय बैलांना पुढे इतकी जडलीय की आता बैलांना बैलगाडीला जरी जुंपले असले किंवा पेरणीच्या वेळी मालकाला फोन आल्यानंतर रिंगटोनचा आवाज आला की बैल जागेवर उभे राहतात. पेरणीच्या काळात पेरणीची गडबड असते. त्यामुळे पेरत असताना फोन आला आणि बैल मालकाचे फोन वरील बोलणे पूर्ण होईपर्यंत बैल जागेवरुन हलत नसल्याने पेरणी कामाला पुढे उशीर होतो.त्यामुळं उमेश याना पेरणी काळात एकतर फोन सायलंट ठेवावा लागतो. या बैलजोडीच्या अनोख्या सवयीमुळे ही बैलजोडी या भागात कौतुकाचा विषय ठरली आहे.