Pune Political News : पुण्यातील (Pune) शिरुर लोकसभा मतदारसंघाचा (Shirur Constituency) पुढचा खासदार हा भाजपचाच असेल. या दाव्यानंतर आता इथला युतीचा उमेदवार कोण असेल? हे भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व ठरवणार आहे. असं केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह (Renuka Singh) यांनी आढळराव पाटील (Adhalrao patil) यांच्या बालेकिल्ल्यात पत्रकार परिषद घेत हे जाहीर केलं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंशी काडीमोड घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या शिवाजी आढळरावांची मोठी गोची झाली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह यांच्यावर शिरुर लोकसभेत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रेणुका सिंह 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर असा शिरुर लोकसभेचा दौरा करत आहेत. या दरम्यान त्या 26 ठिकाणी भेटी देणार आहेत. संघटनात्मक बैठका, कार्यक्रम, हुतात्म्यांना अभिवादन, धार्मिक स्थळी दर्शन, वारकरी संप्रदाय, माजी सैनिक, कार्यकर्त्यांसह मतदारांशी संवाद ही साधत आहेत.
राज्यमंत्री रेणुका सिंहांनी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आढळरावांचे टेन्शन वाढवले आहे. आढळरावांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या मंचरमध्ये त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. 2004 पासून सलग पंधरा वर्षे खासदार राहिलेले आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पुन्हा खासदार होण्यासाठी तयारी करणाऱ्या शिवाजी आढळरावांचं 2024च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार? असा प्रश्न पडला आहे.
भाजप-शिंदे गट युतीत आढळरावांचं भवितव्य काय?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिरुर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांना सोडणार, असं स्पष्ट केलं होतं. म्हणूनच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा शिवसैनिक झाल्याचं, स्वतः आढळरावांनी जाहीर केलं होतं. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आढळराव आक्रमक झाल्याचं तेव्हा सर्वांनी पाहिलं. त्यामुळे भाजप-शिंदे गट युतीत आढळरावांचं भवितव्य काय असणार? असा प्रश्न साहजिकच विचारला जात आहे.
आढळरावांची पुन्हा एकदा गोची?
या सगळ्या प्रकाराची केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंहांना कल्पना असावी.त्यामुळे प्रश्न विचारताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता उत्तर दिलं आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची सत्ता आहे. मात्र येणारा काळ आणि राष्ट्रीय नेतृत्वच ठरवेल की शिरुर लोकसभेचा 2024 मधील उमेदवार कोण असेल. सध्या आम्ही इथे भाजपचं संघटन वाढवण्यावर भर देत आहोत. शिरुर लोकसभेतील सहा आमदारांपैकी भाजपचा केवळ एकच आमदार आहे. उर्वरित पाच आमदार हे विरोधी पक्षाचे आहेत, असं सांगत शिंदे गटाचा एक ही आमदार या शिरुर लोकसभेत नाही, असंही त्या म्हणाल्या.
शिवाजी आढळरावांच्या बालेकिल्ल्यात पत्रकार परिषद घेत, राज्यमंत्री रेणुका सिंहांनी अशी वक्तव्य केली. शिवाजी आढळरावांचं पुढचं भवितव्य हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आढळरावांची पुन्हा एकदा मोठी गोची होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.