नागपूर : राजकारणात अनेक लोकं जेव्हा स्वकर्तृत्वावर उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीचं कार्ड समोर करतात, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सडेतोड मत व्यक्त केलं आहे. नागपुरात माळी समाजाच्या मेळाव्यात गडकरी यांनी उमेदवारीसाठी अतिउत्साही असणाऱ्या राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच माझ्या जातीला आरक्षण नसल्यामुळेच माझी प्रगती झाली, असं देखील गडकरी यांनी म्हटलं आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेने त्यांच्या कार्याचे 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, राजकारणात अनेक लोकं जेव्हा त्यांच्या कर्तृत्त्वावर उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीचं कार्ड समोर करतात. ही लोकं राजकारणात महिला आरक्षणाची मागणी करतात. मात्र इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे या महिला आरक्षणामुळे मोठ्या झाल्या नाही'. तसेच राजस्थानात अशोक गहलोत फक्त माळी समाजाच्या पाठिंब्याने नाही तर सर्व समाजाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले असं देखील गडकरी यांनी म्हटलं आहे.
'माझ्या जातीला आरक्षण नसल्यामुळेच माझी प्रगती झाली. नाही तर मी कुठल्या तरी सरकारी कार्यालयात क्लार्क किंवा बाबू राहिलो असतो', असं देखील गडकरी म्हणाले. 'जेव्हा मी कुटुंबियांना नोकरी न करण्याचा माझा निर्णय ऐकवला होता तेव्हा माझ्या आईने तुझे तर लग्न ही होणार नाही, असे भाकीत व्यक्त केले होते. तेव्हा उद्यमशीलतेचे धाडस केले नसते तर आज एवढी प्रगती साधू शकलो नसतो', असा खुलासा ही गडकरी यांनी केला आहे.
राजकारणात अनेक नेते स्वतःला उमेदवारी न मिळाल्यास स्वतःच्या पत्नी आणि मुलांसाठी उमेदवारी मागतात. एवढेच नाही तर अनेक वेळेला वाहनचालकांचीही उमेदवारी मागतात. मात्र, असे करता येत नाही. राजकारणात असलेल्या आई-वडिलांनी मुलांसाठी उमेदवारी न मागता समाजाने त्यांच्या मुलांसाठी उमेदवारी मागावी, ही आदर्श स्थिती असल्याचे गडकरी म्हणाले.
आज राजकारणात जातीमुळे नव्हे तर लोकांचे काम केल्यामुळे यश मिळते आहे. मोदींनी कधीच त्यांची जात कोणाला सांगितली नाही, याची आठवणही गडकरींनी करून दिली. दरम्यान, आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून माळी समाजाने केंद्र सरकारकडे महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. नितीन गडकरी यांनी ही मागणी केंद्र सरकार समोर खास करून नरेंद्र मोदींसमोर ठेवण्याचे आश्वासन या मेळाव्यात दिले.
राजकारणात जातीचं कार्ड समोर करणाऱ्यांना नितीन गडकरींनी सुनावले खडे बोल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2019 08:08 PM (IST)
राजकारणात असलेल्या आई-वडिलांनी मुलांसाठी उमेदवारी न मागता समाजाने त्यांच्या मुलांसाठी उमेदवारी मागावी, ही आदर्श स्थिती असल्याचे गडकरी म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -