Narayan Rane : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाहत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. धुळे शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नव्यानं दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याची मागणी राणेंनी या याचिकेतून केली आहे. या याचिकेवर येत्या 17 एप्रिल रोजी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.


धुळे इथं दाखल गुन्ह्यात सीआरपीसी कलम 41(अ) अंतर्गत पोलिसांनी 10 मार्च रोजी नोटीस बजावल्यानं नारायण राणे यांनी इतर गुन्ह्यांप्रमाणे हा गुन्हादेखील रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. तातडीच्या सुनावणीसाठी ही याचिका न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली. हा अर्ज सादर करताना यात तातडीचा दिलासा देत यावर इतर याचिकांसोबत सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडे करण्यात आली. मात्र हायकोर्टानं यावर येत्या 17 एप्रिलला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकाच प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आला आहेत. त्यामुळे प्रत्येक एफआयआरला स्वतंत्र याचिकेतून आव्हान देण्यात आलं तर बरं होईल, जेणेकरून याचिकाकर्त्यांनाही त्या-त्या पोलीस ठाण्यातून सुचना आणि माहिती घेणे सोयीस्कर ठरेल, असे हायकोर्टानं यापूर्वीच याचिकाकर्त्यांना सांगितलं आहे.


भाजपनं गेल्यावर्षी सुरू केलेल्या जनआशीर्वाद यात्रेतील महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर बोलताना, "मी असतो तर त्यांच्या कानशिलातच वाजवली असती" असे आक्षेपार्ह विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. त्या वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र पदसाद उमटले आणि राणेंविरोधात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेल्या त्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात धुळ्यासह पुणे, ठाणे, नाशिक, महाड, जळगाव आणि अहमदनगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 500, 505(2), 153 ब (1)(क) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.