Nashik News : केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावर आहेत. कृषीमंत्र्याच्या आजच्या या दौऱ्याकडं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे. कारण, कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क माफ करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. कांदा दरातील घसरण रोखण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ यांनीही निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे.


राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे दोघे एकाच व्यासपीठावर


येणार आहेत. दोन्ही कृषी मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देणार का? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.  केंद्रीय कृषीमंत्री त्रंबकेश्वरचे दर्शनही घेणार आहेत. त्रंबकेश्वर दर्शनानंतर कृषीमंत्री किसान सुसंवाद कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 


दरम्यान, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे आज नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी शेतकरी संघटना कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या संदर्भातील मागणी करणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.