नागपूर : नागपूर मेट्रो रेलमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने आठ तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. तब्बल 87 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली, तर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दाम्पत्यालाही फरार मास्टर माईंडने 21 लाख रुपयांना फसवलं आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचं कार्य सध्या वेगात सुरु आहे. अशात मेट्रोमध्ये नोकरीसाठी अनेक बेरोजगार इच्छुक आहेत. अशाच बेरोजगार तरुणांना मेट्रोमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी मॅनेजर असलेला रवी सत्यम कुमार आणि पल्लवी-प्रशांत हेडाऊ या दाम्पत्याने गंडा घातला.

रवी सत्यम कुमारची हेडाऊ दाम्पत्यासोबत जुनी ओळख होती. प्रशांत हेडाऊ हा प्रॉपर्टी डीलरचं काम करतो, तर पल्लवीला ब्यूटी पार्लर उघडायचं होतं. ब्यूटी पार्लरचं साहित्य दक्षिण भारतात स्वस्त दरात  मिळतं, असं रवी कुमारने पल्लवीला सांगितलं. रवी कुमारवर विश्वास ठेवत पल्लवीने सर्व जमापुंजी गोळा करत त्याच्याकडे 21 लाख रुपये दिले.

पल्लवीची बहीण नागपूर मेट्रोमध्ये नोकरी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं रवी कुमारला समजलं. नागपूर मेट्रोमध्ये मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी असल्याचं रवीने पल्लवीला सांगितलं. मेट्रोत नोकरी पाहिजे असल्यास पैसे द्यावे लागतील, असंही रवी कुमारने सांगितलं. त्याच्यावर विश्वास ठेवत पल्लवीच्या बहिणीने त्याला आठ लाख रुपये दिले. असं एक-एक करत एकूण आठ बेरोजगार तरुणांनी मेट्रोमध्ये नोकरीसाठी पल्लवीच्या माध्यमातून रवी कुमारला एकूण 87 लाख रुपये दिले.

याच वर्षी एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात फसवणूक झालेल्या सर्व बेरोजगार तरुणांनी हे पैसे वेळोवेळी पल्लवी आणि प्रशांत हेडाऊ दाम्पत्याला दिले होते. पुढे ती सर्व रक्कम हेडाऊ दाम्पत्याने रवी कुमारला दिली. सर्वांचा आपल्यावरील विश्वास कायम राहावा आणि आणखी तरुण आपल्या जाळ्यात फसावे, या उद्दिष्टाने रवी कुमारने मेट्रोचे बनावट नियुक्तीपत्र देखील तरुणांना व्हॉट्सअॅप केले.

अनेक दिवस लोटल्यानंतर ही पुढे काहीच होत नसल्यामुळे एका तरुणाच्या नातेवाईकाने खात्री करण्यासाठी या बनावट नियुक्तीपत्राची प्रिंटआऊट काढत मेट्रो कार्यालय गाठलं, तेव्हा ते बनावट असल्याचं उघड झालं आणि या तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली.

प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी प्रशांत आणि पल्लवी हेडाऊ यांना अटक केली आहे, तर रवी कुमार सर्व रक्कम घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणात आणखी काही तरुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनीही तक्रारीसाठी समोर येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पल्लवी हेडाऊने ब्यूटी पार्लरच्या साहित्यासाठी दिलेले 21 लाख रुपये आणि आठ तरुणांनी नोकरीच्या नावावर दिलेले 87 लाख असे एकूण एक कोटी 8 लाख रुपये घेऊन रवी कुमार फरार झाला आहे.. मेट्रोमध्ये नोकरीसाठी प्रसिद्धी माध्यमात जाहिराती निघतात, त्यामुळे कुठल्याही अमिषाला बळी न पडता पूर्ण खात्री करुनच इच्छुकांनी नोकरीसाठी आवेदन करण्याचं आवाहन मेट्रो प्रशासनाने केलं आहे. तर पोलिस मुख्य आरोपी रवी कुमारचा शोध घेत आहेत.