उल्हासनगर : नकली सेल्स टॅक्स अधिकारी बनून धाड मारण्यासाठी आलेल्या पाच भामट्यांना उल्हासनगरात बेड्या ठोकण्यात आल्या. उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील एका दुकानात हे सगळे धाड मारण्यासाठी आले होते. मात्र, यावेळी दुकानमालकाला संशय आल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं या सगळ्यांना पकडलं आणि मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केलं. यानंतर या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार याचा स्पेशल २६ हा चित्रपट आला होता. त्यात बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनून कशाप्रकारे अनेकांना लुबाडण्यात येतं, हे दाखवलं होतं. अगदी असंच प्रकार आज उल्हासनगरात पाहायला मिळाला.

कॅम्प-3 भागातील शांतीनगर परिसरात एका दुकानात दुपारी साडेबाराच्या सुमारास तिघे जण सेल्स टॅक्स ऑफिसर बनून आले आणि त्यांनी कागदपत्रांची मागणी केली. यावेळी इतर दोघं बाहेर गाडीत बसले होते. मात्र या सर्वांच्या एकंदरीत वर्तणुकीवरून हे भामटे असावेत असं संशय दुकानमालक श्रीचंद नागदेव यांना आला आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून या सगळ्यांना पकडून ठेवलं. तसंच पोलिसांना पाचारण करून या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

पोलिसांनी या सगळ्यांना खाक्या दाखवताच त्यांनी आपण बोगस अधिकारी बनून धाड मारण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी इतर कुठे असे प्रकार केले आहेत का? याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी दिली आहे.