उल्हासनगर : उल्हासनगरच्या प्रांताधिकारी विजया जाधव आणि नायब तहसीलदार विकास पवार या दोघांना आज लाचलुचपत विभागाने 4 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.

जमिनीच्या हस्तांतरण प्रकरणात वारसांची नावे चढवून त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी त्यांनी 80 वर्षांच्या वृद्ध महिलेकडे 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीअंती 4 लाख रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी विजया जाधव यांनी तक्रारदाराला चिठ्ठी लिहून देत नायब तहसिलदार विकास पवार यांना पैसे देण्यास सांगितले.

तक्रारदाराने तहसिलदार कार्यालयात जाऊन पवार यांची भेट घेतली असता नायब तहसिलदारांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे ते पैसे देण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे 4 लाख रुपये दिल्यानंतर ठाणे लाचलुचपत विभागानं तो कर्मचारी, नायब तहसिलदार विकास पवार आणि प्रांताधिकारी विजया जाधव यांना अटक केली.