मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. 1 जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपावर पाच दिवसांनंतरही तोडगा निघू शकलेला नाही. बाजारपेठांमध्ये शेतमालाची आवक घटल्यानं भाज्या आणि फळांचे दर गगनाला भिडले आहेत.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान बाजारात भाजीपाला आणि फळांची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे दर कडाडले आहेत. याची झळ साहजिकच सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
नाशिकसह पुण्यामध्ये आज भाज्या आणि फळांची आवक पुरेशी झालेली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणीच पळालं आहे. काल सोमवारी झेड सुरक्षेत दुधाचे 27 टँकर मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आजतरी ही कोंडी फोडतात का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
शेतमालाची कुठे किती आवक?
नवी मुंबई- वाशी एपीएमसी मार्केटला 315 भाजीपाला गाड्यांची आवक झालेली आहे.
नाशिक मार्केट यार्ड : आजही बाजारसमिती बंद, फक्त किरकोळ विक्रेते दिसत आहेत
पुणे बाजार समितीमध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत 657 वाहनांमधून भाजीपाला आणि फळांची आवक, जवळपास पन्नास टक्के आवक
कालच्या महाराष्ट्र बंदमध्ये कुठे काय घडलं?
काल सोमवारी महाराष्ट्र बंददरम्यान काही ठिकाणी अनुचित घटना घडल्यामुळं शेतकऱ्यांच्या बंदला गालबोट लागलं. नंदुरबारमध्ये आंदोलकांनी नाष्ट्याच्या ठेल्यावरील गरम तेलाच्या कडईत पाणी ओतल्यामुळं दोन युवक भाजले. त्यांना उपचारासाठी नवापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे.
सोलापूरमध्ये महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळं आंदोलक शेतकऱ्यांचे पोलिसांशी खटके उडाले. कालच्या संपाचा फटका एसटीच्या वाहतुकीवरही पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी बसच्या काचा फोडण्यात आल्या. नुकसान टाळण्यासाठी काल सकाळच्यावेळी लातूरच्या डेपोमध्ये बस थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
बारामतीच्या कोऱ्हाळे बुद्रुकमध्ये चक्क लग्नासाठी निघालेला नवरदेवांनी आंदोलनाला हजेरी लावून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला.