नाशिकः यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या 135 पैकी तब्बल 57 अभ्यासक्रमांची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठासोबतच विद्यार्थ्यांनाही देखील मोठा फटका बसला आहे.


 

 

रद्द करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमध्ये पत्रकारिता, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डिझायनिंग, बीएससी अशा अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सध्या या अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

 

या कारवाईला विद्यापीठाची मलिन प्रतिमा कारणीभूत?

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी हजारो कॉपी बहाद्दर सरकारी बाबूंना पकडण्यात आलं होतं. त्यानंतर हे विद्यापीठ जास्त चर्चेत आलं होतं.

 

 

विद्यापीठाने सुरु केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना सहा सहा महिने पुस्तकं देखील उपलब्ध होऊ शकले नाहीत. परीक्षा उलटून दोन ते अडीच महिने झाले तरी निकालासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्याचप्रमाणे विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास तो वेगळाच.

 

 

विद्यापीठाच्या भोगंळ कारभारच्या या तक्रारीच अभ्यासक्रम रद्द करण्यामागचं कारण आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंनी या बाबत बोलण्यास नकार दिला आहे.

 

विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने नाशिक मध्ये 1989 साली मुक्तविद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

 

 

मुंबईच्या डबेवाल्यांपासून ते अगदी गृहिणींना उपयुक्त असे अभ्यासक्रम चालवले गेल्याने विद्यापीठाची चर्चा सर्व दूर पसरली आणि या विद्यापीठाचे नाव देशातील टॉप टेन विद्यापीठांमध्ये मध्ये येऊ लागलं. मात्र कालांतराने विद्यापीठाचा भोंगळ कारभार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चव्हाट्यावर येऊ लागला.

 

 

यावर्षी विद्यापीठाने 135 अभ्यासक्रमांची परवानगी यूजिसिकडे मागितली होती मात्र यूजिसिने केवळ 78 अभ्यासक्रमांना मान्यता देत तब्बल 57 अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे रद्द झालेल्या अभ्यासक्रमात शिकत असलेले विद्यार्थी चांगलेच संकटात सापडले आहेत. विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे.