मुंबई : कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी एसीबीने माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे.  एसीबीनं मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसेंचे नाव नाही.

 

त्यामुळे या प्रकरणातून एकनाथ खडसे निर्दोष सुटण्याची चिन्हं आहेत.



गजानन पाटील याला ज्या ठिकाणांवरुन एसीबीने ताब्यात घेतले होते, ते ठिकाण म्हणजे खडसेंचे मंत्रालयातील दालन याचाही उल्लेख नसून, मंत्रालय असा उल्लेख आरोपपत्रात आहे. हे आरोपपत्र १ हजार पेक्षा जास्त पानांचे असून, फक्त गजानन पाटील यालाच फक्त आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे एसीबीने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली असं स्पष्ट होतं.

 

दरम्यान, एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर खडसेंनी आनंद व्यक्त केला आहे.  आरोप करण्यापूर्वी एकानेही पुरावा दिलेला नव्हता. मी प्रत्येकाला पुरावा देण्याचं आवाहन करत होतो. मात्र कोणीही पुरावे देऊ शकले नाहीत. पण मी नैतिकतेतून राजीनामा दिला. माझी चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोप करणाऱ्यांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया खडसेंनी एबीपी माझाकडे दिली.

 

संबंधित बातमी - गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील


 

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र खडसेंना पुराव्यानिशी भ्रष्ट सिद्ध करु असं ठणकावून सांगितलं. काळबेरं असल्याशिवाय आरोप होत नाहीत. त्यामुळे खडसेंवरील आरोप कागदोपत्री सिद्ध करुन दाखवू, असं दमानिया म्हणाल्या.

 

याला उत्तर देताना खडसे म्हणाले, "दमानियांनी मी घाबरत नाही. हिम्मत असेल तर कोर्टात जा. तिथे पुरावे द्या, न्यायव्यवस्था सर्व काही पाहून घेईल. राज्यभरात आमचे कार्यकर्ते विविध कोर्टात आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहेत" असं खडसे म्हणाले.

 

काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण?

राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी 14 मे रोजी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.

ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.

 

लोकायुक्तांकडूनही क्लीन चीट

लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीनं गजानन पाटलाला मंत्रालयाबाहेर रंगेहात अटक केली होती. या लाचखोरी प्रकरणी तक्रारदार रमेश जाधवांनी एकनाथ खडसेंविरोधात लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. लोकायुक्तांनी रमेश जाधव आणि गजानन पाटील यांच्यातील संभाषणाच्या 12 रेकॉर्डिंग तपासल्या. मात्र ती 30 कोटींची लाच एकनाथ खडसेंद्वारे मागितल्याचं कुठंच सिद्ध होत नसल्यामुळं लोकायुक्तांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली होती.

संबंधित बातम्या


30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक


जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे


खडसे, महाजनांवरील आरोप खोटे : मुख्यमंत्री


अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा, सर्व मंत्रिपदं सोडली


एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना


गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील